पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 27 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर मलेरियाचे 6 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली आहे.
पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून कीटकजन्य आजारांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या महिन्यामध्ये 35,165 तापाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये डेंग्यूच्या 562 संशयित रुग्णांपैकी 27 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मलेरियाचे 6 पॉझिटिव्ह तर चिकुनगुनियाचे 2 संशयित रुग्ण आढळले आहे. (Latest Pimpri chinchwad News)
सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पाऊस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे दलदल, त्यामुळे डासांची होणारी उत्पत्तीही साथीच्या आजारांसाठी कारणीभूत ठरते.
तसेच अशुद्ध, प्रदूषित हवा या परिस्थितीत भर घालते. परिणामी या महिन्यात कीटकजन्य आजार आणि साथीच्या आजाराने त्रस्त रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. थंड वातावरणामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले यांच्यामध्ये सर्दी, खोकला आणि कफ होण्याचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे पालिका, खासगी रुग्णालयांत रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.डेंग्यूच्या डासांची निर्मिती प्रामुख्याने अस्वच्छ घरांमध्ये त्याचप्रमाणे भोवताली साठलेल्या आणि साठवलेल्या पाण्यामध्ये होत असल्याने हा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे.