देहूगाव : देहूरोड पोलिसांनी एक प्रशंसनीय उपक्रम राबवत, हरवलेले आणि चोरीला गेलेले मोबाईल शोधून त्यांच्या मालकांना परत केले आहेत. बुधवार (ता.12 ) रोजी सायंकाळी 5 वाजता देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या हस्ते सत्तरपैकी छत्तीस मोबाईलधारकांचे हरवलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले.(Latest Pimpri chinchwad News)
पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, सहाय्यक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या पुढाकाराने सहायक पोलिस निरीक्षक अक्षय जाधव, पोलिस कॉन्स्टेबल ऐश्वर्या राऊत , मयूर घागरे यांनी ही कामगिरी केली.
देहूरोड पोलिस स्टेशन हद्दीत अनेक मोबाईल चोरीस गेले तसेच हरवले असलेबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल झाल्या होत्या. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या सीईआयआर या विशेष वेबपोर्टलवर हरवलेल्या मोबाईलची नोंद करण्यात आल्यानंतर, पोलिसांनी त्याचा तांत्रिक तपास सुरू केला होता.
राज्य शासनाने एक सीईआयआर पोर्टल सुरू केले आहे. ज्यांचे मोबाईल हरवले किंव्हा चोरीला गेले असतील अशा मोबाईलधारकांनी या वेबपोर्टलवर जाऊन स्टार हॅश, 06 हॅश टाकला की आपल्या मोबाईलचा आयएमईआय नंबर मिळतो. त्यावरून मोबाईलचा शोध घेऊ शकता.विक्रम बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, देहूरोड