Water Tanker Pudhari
पिंपरी चिंचवड

Dehugaon Water Shortage: गणेशोत्सवात देहूगावात ‘पाणीबाणी’; तीन दिवस पाणीपुरवठा ठप्प, टँकरसाठी हजारोंचा खर्च

विठ्ठलवाडी, बाजारआळी, देहू-आळंदी रोड, गाथा मंदिर परिसरातील नागरिक त्रस्त; नगरपंचायतीच्या कारभारावर संताप

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: ऐन गणेशोत्सवाच्या सणासुदीत तीर्थक्षेत्र देहूगावातील काही भागांवर तीन दिवसांपासून पाणीबाणी ओढवली आहे. विठ्ठलवाडी, बाजारआळी, देहू-आळंदी रोड, गाथा मंदिर परिसरासह काही भागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत असून, त्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी देहू नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

ऐन सणासुदीच्या काळात तीन-तीन दिवस नागरिकांना पाणी मिळत नसेल तर, प्रशासन नेमके काय करते? असा सवाल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली काळोखे यांनी उपस्थित केला. देहू नगरपंचायत हद्दीत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, त्याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बुधवारी कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा करण्यात आला.

त्यानंतर गुरुवारी साप्ताहिक सुटी आणि शुक्रवारी तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक भागांतील पाणीपुरवठा ठप्प झाला. सलग तीन दिवस पाणी न आल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. विशेष म्हणजे तीर्थक्षेत्र देहूत दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असताना पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने भाविकांनाही त्रास सहन करावा लागला.

शासनाने पाणीपुरवठा विभाग ताब्यात घ्यावा

तीन दिवसांपासून देहू-आळंदी रोड, गाथा मंदिर परिसरातील नागरिक पाण्यापासून वंचित आहेत. नागरिकांना हजारो रुपये खर्च करून टँकरचे पाणी घ्यावे लागत आहे. नगरपंचायतीला पाणीपुरवठा सुरळीत करता येत नसेल तर, शासनाने पाणीपुरवठा विभाग ताब्यात घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील नागरिक राजू खंडागळे यांनी व्यक्त केली.

भाविकांचेही हाल

तीर्थक्षेत्र देहूगावात दर्शनासाठी हजारो भाविक येतात. गेल्या तीन दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांसह भाविकांचेही प्रचंड हाल झाले. पाणीपुरवठा सुरळीत करता येत नसेल तर, नगरसेवकांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संत तुकाराम महाराजांचे वंशज नाना मोरे यांनी केली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी हाल

विठ्ठलनगरमध्ये तीन दिवसांपासून पाणी नाही. सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचे? प्रत्येकाला हजार रुपये खर्च करुन टँकर मागवणे शक्य नाही. त्यामुळे नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत, असे परिसरातील नागरिक राजेंद्र हगवणे यांनी सांगितले.

मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष

नागरिकांना पुरेसे आणि गरजेपुरते पिण्याचे पाणी देता येत नसेल, तर नगरपंचायत गावाचा विकास काय करणार? अधिकारी व पदाधिकारी यांची मिलीभगत असून, जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असेल, तर आमदार व नगरसेवकांनी राजीनामा द्यावा. नगरपंचायत बरखास्त करुन ती शासनाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली काळोखे यांनी केली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा विस्कळीत

देहू नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाचे धनंजय नाईकवडी यांनी सांगितले, की तांत्रिक अडचणीमुळे पाणीपुरवठा सुरळीत करता आला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT