Indrayani River Pollution Pudhari
पिंपरी चिंचवड

Indrayani River Pollution: देहूगावातील इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात

सांडपाणी थेट नदीत; वारकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर धोका

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: तीर्थक्षेत्र देहूगावातील पवित्र इंद्रायणी नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, शहरातील सोसायट्या व परिसरातील गटारांचे मैला मिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या दूषित पाण्यामुळे वारकरी भाविकांच्या आरोग्यावर मोठा धोका निर्माण झाला आहे.

परिसरात दुर्गंधी

काळोखेमळा परिसरातून येणाऱ्या ओढ्यात माळीनगरमधील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे. हेच दूषित पाणी पुढे इंद्रायणी नदीत मिसळत आहे. तसेच पाण्याच्या टाकी परिसरातून, सिद्धेश्वर मंदिराजवळील भागातून आणि पोलीस चौकीमागील गटारांमधूनही मोठ्या प्रमाणात सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काही ठिकाणी एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) साठी बांधलेले चेंबर फुटल्याने घाणपाणी थेट नदीत मिसळत असून, परिसरात तीव दुर्गंधी पसरली आहे. या ओढ्या, नाल्याजवळ गेल्यास घाण पाण्यामुळे सुटणाऱ्या दुर्गंधीमुळे श्वास घेणेदेखील कठीण होत आहे.

तात्पुरते उपाय; कायमस्वरूपी तोडगा नाही

प्रत्येक मोठ्या धार्मिक सोहळ्यापूर्वी प्रशासनाकडून तात्पुरते उपाय केले जातात. आढावा बैठका, सूचना आणि तात्पुरते बांध घालून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होतो. मात्र, सोहळा संपताच पुन्हा परिस्थिती ‌‘जैसे थे‌’ होत असल्याचे वास्तव आहे. शासनाच्या श्रीक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत राबविण्यात आलेली भुयारी गटार योजना निष्फळ ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

त्यामुळे शासन वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळत आहे का?, असा संतप्त सवाल भाविक आणि स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. इंद्रायणी नदीत सांडपाणी मिसळणे तातडीने थांबवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात; अन्यथा इंद्रायणीची स्थितीही पवना नदीप्रमाणे होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गंभीर आजार

दररोज हजारो भाविक आणि पर्यटक इंद्रायणी नदीत स्नान करून हेच पाणी पवित्र समजून प्राशन करतात. मात्र, या पाण्यात मिसळणाऱ्या अस्वच्छ सांडपाण्यामुळे कॅन्सर, जुलाब यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे कार्तिकी यात्रा, संत तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळा आणि आषाढी पायी वारी यांसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यांवेळी लाखो वारकरी देहूत दाखल होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT