देहूगाव: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीअंतर्गत कृषी महाविद्यालय व विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेशखिंड (पुणे) तसेच तालुका कृषी अधिकारी, हवेली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'शेतकरी-शास्त्रज्ञ मंच' प्रशिक्षण कार्यक्रम शुक्रवारी (दि. १४) देहू माळीनगर येथे उत्साहात पार पडला.
तालुका कृषी अधिकारी अमित रणवरे आणि मंडळ कृषी अधिकारी, मोशी तुषार खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी थेट गावात पोहोचून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि कीड-रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले. कृषी संशोधनाचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय लाड, सहप्राध्यापक डॉ. रणजित निंबाळकर, डॉ. सुनील लोहाटे आणि डॉ. नजीर तांबोळी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. देहू येथे 'शेतकरी-शास्त्रज्ञ मंच' स्थापन करून कृषी विद्यापीठात विकसित होणारे नवे संशोधन, तंत्रज्ञान व प्रयोग शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे कसे पोहोचविता येतील, याबाबत डॉ. लाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. नजीर तांबोळी यांनी विविध जैविक बुरशीनाशके, मित्रकीटक व जैविक पद्धतीने कीड नियंत्रण याबाबत माहिती दिली. डॉ. निंबाळकर व डॉ. लोहाटे यांनी फुलपिके आणि भाजीपाला पिकांच्या उत्पादनवाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि आधुनिक पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. यानंतर शेतकऱ्यांच्या सोयाबीन व भाताच्या प्लॉटला प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी करण्यात आली. या वेळी पिकांवरील कीड व रोगांची लक्षणे ओळखणे, त्यावरील उपाययोजना आणि पीक संरक्षणाच्या प्रभावी पद्धती याबाबत शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष बांधावर मार्गदर्शन केले.
आत्मा (एटीएमए) अंतर्गत बीटीएम रेश्मा शिंदे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देत शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सहाय्यक कृषी अधिकारी, चऱ्होली रुपाली भोसले यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी अधिकारी, देहू जयश्री पाडेकर यांनी केले.
कार्यक्रमास नंदू काळोखे, अंकुश हगवने, गणेश हगवने, सागर हगवने, प्रवीण हगवने, जालिंदर हगवने, सुदाम काळोखे, शांताराम शेवकर, महेंद्र टिळेकर, विलास जगताप, मुकुंद बालसराफ, योगेश बालसराफ, सुभाष टिळेकर, सुरेखा टिळेकर, प्रभाकर खेडकर, अशोक जगताप, मनोज विधाते, निखिल बालसराफ, सोमनाथ कड, दिलीप जगताप, शरद काळोखे, बापू टिळेकर, चंद्रकांत टिळेकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व पूर्वतयारी शांताराम शेवकर आणि महेंद्र टिळेकर यांनी केली.