Dehugaon Pudhari
पिंपरी चिंचवड

Dehugaon Encroachment Issue: देहू कमान परिसरातील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी; आषाढी पालखीपूर्वी रस्ते मोकळे करण्याची मागणी

भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतुकीवर ताण; फळ-भाजी विक्रेते व व्यावसायिकांच्या अतिक्रमणांवर प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र देहू येथील मुख्य कमान परिसरासह पश्चिम दिशेकडील रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अतिक्रमणांमुळे परिसरात वाहतूककोंडी होत असून, वाहनांच्या रांगा लागत आहेत.

वाहतुकीवर ताण

संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी असलेल्या देहूत दररोज २० ते २५ हजार भाविक, भक्त दर्शनासाठी येत असतात. मंगळवार व शुक्रवार या दिवशी आठवडी बाजार भरत असल्याने गर्दीचे प्रमाण अधिक वाढते. सध्या देहूची लोकसंख्या ४० ते ५० हजारांच्या घरात पोहोचली असून, त्यातच भाविकांची मोठी वर्दळ असल्याने वाहतुकीवर ताण येतो. मेन कमान परिसरातील रस्त्यावर फळ-भाजी विक्रेते व इतर व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद झाला असून, याचा थेट परिणाम वाहतुकीवर होत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष

यासाठी उपाययोजना म्हणून आठवडी बाजारातील काही भाग अन्य ठिकाणी हलविण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माऊली काळोखे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच, याबाबत पूर्वीही पत्रव्यवहार करण्यात आला असला तरी नगरपंचायतीकडून ठोस निर्णय घेतला गेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

याशिवाय, वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात स्थानिक प्रशासन व संबंधित संस्थांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व सुरळीत वाहतुकीसाठी तातडीने अतिक्रमण हटवून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर

गावातील सर्वसामान्य नागरिक, दुकानदार यांनी स्व:ताहून अतिक्रमणे काढून घेत नगरपंचायत प्रशासनाला मदत केली, परंतु कमानीच्या पश्चिम भागात असलेले पत्र्यांचे शेड, सिमेंट, बांधकामासाठी लागणारी खडी आदी साहित्य रस्त्यावर असताना देहू नगरपंचायतीकडून अद्याप यावर कारवाइ करण्यात न आल्याचा आरोप माऊली काळोखे यांनी केला आहे. देहू कमानीच्या पश्चिम बाजूला आजही रस्त्यावर अतिक्रमण आहे. अनेक विक्रेते रस्त्यांवरच आपली हातगाडी लागत आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत असून, वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT