देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारित असलेली देहूरोड बाजारपेठेतील महात्मा गांधी मराठी शाळा सध्या पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत आहे. शाळेच्या धोकादायक इमारत मद्यपी व गर्दुल्यांचा अड्डा बनली आहे. ही इमारत धोकादायक म्हणून घोषित करण्यात आली असली, तरी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे मद्यपींचा वावर वाढला आहे.
दिवसा तसेच रात्री उघडपणे गर्दुल्यांचे टोळके शाळेच्या आवारात नशा करत ठाण मांडून बसते. त्यानंतर हे टोळके बाजारपेठेत धुमाकूळ घालत व्यापारी, महिला, तरुणी व नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत. विशेषतः महिलांमध्ये व तरुणींमध्ये सुरक्षिततेबाबत तीव चिंता निर्माण झाली असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या दोन महिन्यांत बाजारपेठेत चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काही रात्री चार ते पाच दुकाने फोडल्याच्या घटना घडल्या असून, व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात असुरक्षिततेची भावना वाढत असून, रात्री दुकाने बंद करताना भीती वाटत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
महात्मा गांधी मराठी शाळेची इमारत सध्या पूर्णतः जीर्ण व धोकादायक बनली आहे. परिसरातील अंधार आणि देखरेखीअभावी समाजकंटकांना लपण्यास व गैरकृत्ये करण्यास मोठा वाव मिळत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते ही जागा आता गुन्हेगारीचे केंद्र बनत चालली आहे.
ही जागा मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्थानक, राष्ट्रीयकृत बँका, पोस्ट ऑफिस तसेच मुंबईड्ढपुणे महामार्गाजवळ असल्यामुळे येथे व्यापारी संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी व्यापारी धनराज शिंदे यांनी केली आहे. व्यापारी संकुल उभारल्यास रोजगाराच्या संधी वाढतील, बाजारपेठेला चालना मिळेल तसेच परिसरातील सुरक्षेचा प्रश्नही सुटेल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड व संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. प्रशासनाने तातडीने धोकादायक इमारत पाडावी, परिसरात पोलिस गस्त वाढवावी तसेच या जागेचा योग्य व सुरक्षित विकास करावा.सूर्यकांत सुर्वे, अध्यक्ष, व्यापारी संघटना
संबंधित विषयासंबंधी मला माहिती नाही. या गोष्टीची मी प्रथम माहिती घेतो. त्यानंतर याविषयी बोलतो.ॲड. कैलास पानसरे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासक