Indrayani River Pollution Pudhari
पिंपरी चिंचवड

Dehu Indrayani River Pollution: बीजसोहळ्याआधी इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात; वारकऱ्यांत संताप

सांडपाणी थेट नदीपात्रात; लाखो भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीजसोहळ्याला अवघे काही दिवस उरले असताना देहूनगरीतील इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. देहू नगरपंचायत हद्दीतील काही भागातील दुर्गंधीयुक्त सांडपाणी थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात असल्याने वारकरी, भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

वारकऱ्यांकडनू नाराजी

राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दरवर्षी बीजसोहळ्यानिमित्त देहूत दाखल होतात. परंपरेनुसार भाविक प्रथम इंद्रायणी नदीचे दर्शन घेतात. नदीतील पाणी पवित्र मानून प्राशन करतात आणि त्यानंतर मंदिरात दर्शनासाठी जातात. घाट परिसरात सप्ताह, भजन-कीर्तन यांसह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होते. अनेक ठिकाणी स्वयंपाकासाठीही नदीचे पाणी वापरले जाते. भाविकांच्या श्रद्धास्थानी असलेली इंद्रायणी नदी ‌’अमृततुल्य‌’ मानली जात असताना त्याच नदीत मैलामिश्रित सांडपाणी मिसळत असल्याने तीव नाराजी व्यक्त होत आहे.

धर्मशाळेचे सांडपाणीही नदीत

मुख्य मंदिरालगत इंद्रायणी घाटालगतच्या एका धर्मशाळेचे सांडपाणीही थेट नदीत सोडले जात असल्याची बाब समोर आली आहे. काही ठिकाणी सांडपाणी साचून डासांची उत्पत्ती वाढत असल्याने साथीच्या आजारांचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. येत्या 5 मार्च रोजी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत बीज सोहळा पार पडणार आहे. अशा पार्श्वभूमीवर स्थानिक ग््राामस्थ व वारकरी भाविकांनी तातडीने सांडपाणी व्यवस्थापनाची प्रभावी उपाययोजना करावी, नदी प्रदूषण रोखावे आणि घाट परिसर स्वच्छ ठेवावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, स्थानिक संस्था तसेच तालुका व जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या इंद्रायणीचे पावित्र्य आणि वारकऱ्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT