देहूगाव: दिवाळी सणाच्या उत्साहात फटाके फोडताना घेतलेल्या निष्काळजीपणामुळे श्रीक्षेत्र देहूगाव परिसरात आगीच्या तीन घटना घडल्या आहेत. फटाक्यांतून उडालेल्या ठिणग्यांमुळे विविध ठिकाणी आग लागून मालमत्तेचे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर देहूगावातील रहिवासी तसेच वर्दळीच्या भागांमध्ये फटाक्यांच्या विक्रीसाठी दुकाने थाटण्यात आली होती. अशा गर्दीच्या आणि रहिवासी भागांमध्ये फटाक्यांची विक्री करताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांची आवश्यकता असते. मात्र, फटाके फोडताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्याने आगीच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे लागलेल्या आगीत मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुर्दैवाने जीवितहानी टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी या घटनांमुळे फटाक्यांच्या विक्रीच्या ठिकाणी तसेच आतषबाजीदरम्यान सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रहिवासी आणि वर्दळीच्या परिसरात फटाक्यांची विक्री करण्यास परवानगी देताना प्रशासनाकडून पुरेशा सुरक्षा उपाययोजना केल्या जातात का?, आगीच्या घटना रोखण्यासाठी अग्निसुरक्षेची साधने उपलब्ध असतात का?, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने फटाका विक्रीची ठिकाणे आणि सुरक्षिततेच्या नियमांची काटेकोर तपासणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.