दापोडी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये व्यावसायिकांनी रस्ता व पदपथावर अतिक्रमण केल्याने रस्ता वाहतुकीस अरुंद झाला. परिणामी या भागातून प्रवास करणार्या वाहनचालकांना ऐन सणासुदीत वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. या कोंडीतून मार्ग काढताना पादचारी व वाहनचालकांची दमछाक होत आहे. येथील अतिक्रमण त्वरित हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Latest Pimpri chinchwad News)
वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने हजारो रुपये खर्च करून दुभाजक बनविले आहेत. मात्र, चौकामधील नागरिकांच्या वर्दळीचा फायदा घेण्यासाठी व्यावसायिकांनी आपले बस्तान रस्त्यावर मांडले आहे. या चौकामध्ये बोपोडीकडून येणारी वाहने तसेच जुन्या सांगवीकडून येणारी वाहने व भाजीमंडईकडून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ यांचा संगम होतो. त्यामुळे सायंकाळी वडापावची व चायनीज हातगाड्या यामुळे चौकामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या चौकामध्ये वाहतूक पोलिस नसल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
सायंकाळी या चौकात रिक्षा व दुचाकी अस्ताव्यस्त पार्किंग केल्यामुळे पीएमपीच्या बसचालकाला बस वळविताना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. रिक्षाचालक रस्त्यावरच रिक्षा थांबून आपल्या कामासाठी निघून जातात. या उभ्या असलेल्या रिक्षामुळे वाहतूक कुंडीमध्ये भर पडते. या सर्व गोष्टीचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे.
अनधिकृत पार्किंग ठरतेय डोकेदुखी
परिसरामध्ये वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. परिसरातील 60 ते 80 फुटापेक्षा अधिक रस्ते वाहनांच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे अपुरे पडत आहेत. यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. परिसरातील अनेक प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण होऊनही तासंतास वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. बहुतांश चौकात प्रमुख रस्त्याच्या कडेला स्वतःची खाजगी वाहने उभी करून जास्तीची वाहतूक कोंडीत भर टाकण्याचे काम स्थानिक रहिवाशी करीत आहेत. या गोष्टीकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. संबंधित प्रशासनाने कायमस्वरूपी रस्त्यावर उभी असणाऱ्या वाहनावर कारवाई करणे गरजेचे आहे. दिवसा व रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने येणारी वाहने चौकात अचानक बेक लावल्यामुळे रोजच अपघात होतात. यामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे उप रस्त्यावर गतिरोधक बसविणे गरजेचे आहे.
अतिक्रमणाकडे डोळेझाक
रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग, व्यावसायिकांचे अतिक्रमण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहन चालक बिनधास्तपणे जागा मिळेल तिथे वाहने उभी करतात. त्यातच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानदाराने दुकानातील सामान अगदी रस्त्यावर मांडलेले असते. त्यामुळे नागरिकांना चालण्यासाठी मुख्य रस्त्याचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन चालावे लागते. संबंधित वाहतूक प्रशासन व महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने याची दलख घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे.
या चौकामध्ये नियमित वाहतूक कोंडी होऊन अपघात होत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्यांचे प्रमाण वाढल्याने वाहतुकीसाठी अरुंद रस्ते होत आहेत. यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणे जिकीरीचे बनले आहे. याबाबत वाहतूक विभागाकडे तक्रारी करूनदेखील कारवाई होत नाही.स्थानिक
डॉ. आंंबेडकर चौकात सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहनांची व नागरिकांची गर्दी असते. या चौकाची पाहणी करून वरिष्ठांशी चर्चा करून वाहतूक पोलिस नियुक्त करण्यात येईल. तसेच अनधिकृतपणे पार्किंग करणाऱ्या वाहनांवरदेखील कारवाई करण्यात येईल.दीपक साळुंके, वाहतूक पोलिस निरीक्षक, भोसरी