Traffic Jam Pudhari
पिंपरी चिंचवड

Dapodi Traffic Jam: दापोडी-फुगेवाडीत वाहतूक कोंडीचा विळखा; खड्डे, अतिक्रमण अन् रखडलेल्या कामांनी वाहनचालक हैराण

दापोडी रेल्वे स्थानकापासून कासारवाडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; विरुद्ध दिशेने वाहतुकीमुळे अपघाताचा धोका

पुढारी वृत्तसेवा

​दापोडी: जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील दापोडी आणि फुगेवाडी प्रवेशद्वारावर गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. फुगेवाडी, कासारवाडीतील अंतर्गत अरुंद रस्ते आणि महामार्गावर बाहेर पडताच समोर उभी ठाकणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालक प्रचंड मनस्ताप सहन करत आहेत.

दापोडी, फुगेवाडी आणि कासारवाडी ही उपनगरे महामार्गालगत असल्याने येथे वाहनांची मोठी वर्दळ असते, मात्र नियोजनाच्या अभावामुळे आणि विकासकामांना होणाऱ्या प्रशासकीय दिरंगाईमुळे हा संपूर्ण परिसर वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकला आहे. खड्डे, वाहतूक कोंडी अन् रेंगाळलेल्या कामांमुळे वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. फुटपाथवर अतिक्रमणे, वाहन पार्किंग यामुळे ही वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

दापोडी येथे पेट्रोल, डिझेलसह सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी अनेक वाहनचालक चक्क विरुद्ध दिशेने येतात. ज्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावून अपघाताचा धोका निर्माण होतो. तसेच, दापोडी येथील मेट्रो स्थानकाचा वापर करताना रस्ता ओलांडण्याऐवजी विरुद्ध दिशेने प्रवासी जातात. अनेकदा दापोडी रेल्वे स्थानकापासून ते थेट फुगेवाडी, कासारवाडीपर्यंत दोन-दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागून प्रवाशांचा खोळंबा होतो.

बीआरटी मार्गाचे काम कासवगतीने

बीआरटी मार्गावरील रस्त्याची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून कासवगतीने सुरू आहेत. मुळातच वर्दळीचा रस्ता असलेल्या या महामार्गावर अर्धवट राहिलेल्या कामांमुळे रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. खोदून ठेवलेले रस्ते आणि ठिकठिकाणी पडलेला राडारोडा यामुळे धुळीचा आणि खड्ड्यांचा अतोनात त्रास येथील नागरिकांना आणि व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. ही रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याऐवजी प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

​दापोडी आणि फुगेवाडी परिसरातील पेट्रोल पंप आणि मेट्रो स्थानकाजवळ विरुद्ध दिशेने येणारे दुचाकीस्वार निष्पाप लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. त्यातच रस्ते कामांचा जो रेंगाळलेला कारभार सुरू आहे, त्यामुळे आम्हाला महामार्गावरून जाणे कठीण झाले आहे. ही कामे प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावीत आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. आमची दररोज होणाऱ्र्या वाहतूक काेंडीतून सुटका करावी.
पै. हेमंत फुगे, स्‍थानिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT