Dapodi Traffic Jam Pudhari
पिंपरी चिंचवड

Dapodi Traffic Jam: दापोडी-फुगेवाडीमध्ये वाहतूक कोंडीचा कहर; बेशिस्त पार्किंग आणि बीआरटी कामांमुळे नागरिक त्रस्त

मुंबई-पुणे महामार्गावर अर्धा ते एक तासांचा प्रवास; प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी तीव्र

पुढारी वृत्तसेवा

बलभीम भोसले

दापोडी: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील दापोडी, फुगेवाडी आणि कासारवाडी परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. अंतर्गत अरुंद रस्ते, संथगतीने सुरू असलेली विकासकामे, बेशिस्त वाहनचालक आणि महामार्गालगतचे अनियोजित पार्किंग यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः वाहनांच्या रांगांनी वेढला जात आहे. सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी नागरिकांना काही किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी तब्बल अर्धा ते एक तास खर्च करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दापोडी येथील पेट्रोल, डिझेल तसेच सीएनजी पंपावर जाण्यासाठी अनेक वाहनचालक थेट विरुद्ध दिशेने वाहने चालवत असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावतोच, शिवाय अपघाताचाही धोका वाढत आहे. मेट्रो स्थानक परिसरातही पादचारी रस्ता ओलांडण्यासाठी नियोजित मार्गाचा वापर न करता थेट वाहतुकीच्या दिशेतून ये-जा करत असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनत आहे.

माहमार्गावर वाहने धूळ खात

फुगेवाडी परिसरात महामार्गालगत बेशिस्तपणे उभी करण्यात येणारी वाहने वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहेत. त्यातच महामार्गावरील दापोडी, फुगेवाडी आणि कासारवाडी परिसरातील रस्त्यांवर अनेक दिवसांपासून वाहने धूळ खात पडलेली आहेत. या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी होत असून, वाहतुकीचा पूर्ण ताळमेळ बिघडत आहे. परिणामी दापोडी रेल्वे स्थानकापासून ते थेट फुगेवाडी, कासारवाडीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

कारवाईची गरज

वाहतूक पोलिसांकडून केवळ दंडात्मक कारवाई न करता विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर आणि रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करून वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दापोडी आणि फुगेवाडी परिसरातील संतप्त नागरिकांनी दिला आहे.

बीआरटी मार्गाचे डांबरीकरण रेंगाळले

बीआरटी मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. मागील अनेक महिन्यांपासून अर्धवट खोदलेले रस्ते, राडारोडा आणि धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. व्यावसायिकांनाही या परिस्थितीचा आर्थिक फटका बसत असून, ग्राहकांची संख्या घटल्याची तक्रार व्यापाऱ्यांकडून केली जात आहे. कामे रखडल्याने रस्ता अधिक अरुंद झाला असून, प्रत्येक चौकात वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण होत आहे.

या उपाययोजनांची गरज

  • विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.

  • रस्त्यावरील बंद व धूळ खात पडलेली वाहने तातडीने हटविणे.

  • बीआरटी रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे.

  • मेट्रो स्थानक परिसरात पादचारीमार्ग सुरक्षित करणे.

  • महामार्गालगत बेशिस्त पार्किंग रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविणे.

  • गर्दीच्या वेळेत अतिरिक्त वाहतूक पोलिसांची नियुक्ती करणे.

दररोज कामावर जाण्यासाठी घरातून वेळेआधी निघावे लागते. वाहनांची वेगमर्यादा वाढल्यामुळे अपघात वाढत आहेत. काही मिनिटांचा प्रवास तासाभरात पूर्ण होतो. प्रशासनाने केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात.
कालीचरण पाटोळे, स्थानिक नागरिक
रस्त्यावर उभी असलेली बंद वाहने आणि अर्धवट कामांमुळे वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे. पावसाळ्यापूर्वी रखडलेली कामे पूर्ण करावीत.
हेमंत फुगे, फुगेवाडी
फुगेवाडी चौकामध्ये जलवाहिनी, मेट्रो तसेच पदपथ दुरुस्तीचे काम सुरू आहे. या चौकामध्ये वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या ठिकाणी अतिरिक्त पोलिस शिपाई किंवा ऑर्डनची व्यवस्था करण्यात येईल. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल.
वर्षाराणी पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग, दापोडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT