YCM Hospital Wall Collapse Risk Pudhari
पिंपरी चिंचवड

YCM Hospital Wall Collapse Risk: वायसीएम रुग्णालयाची संरक्षक भिंत धोकादायक; वर्दळीच्या रस्त्यावर अपघाताची टांगती तलवार

शनी मंदिर–फुलेनगर मार्गावरील भिंत खचली; लोखंडी ग्रील कोसळण्याची भीती, तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वल्लभनगर: शनी मंदिर ते फुलेनगर या अत्यंत वर्दळीच्या मार्गालगत असलेल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) संरक्षक दगडी भिंतीचा मोठा भाग खचल्याने गंभीर अपघाताची भीती निर्माण झाली आहे. भिंतीवर बसविण्यात आलेले लोखंडी ग्रीलही सध्या धोकादायक अवस्थेत असून, ते कोणत्याही क्षणी रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी

घटनेनंतर संबंधित विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून धोकादायक भागाभोवती सुरक्षा फीत लावून परिसर बंदिस्त केला आहे. मात्र, केवळ फीत लावून प्रशासनाने जबाबदारी झटकली असून, कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यात भिंत आणखी खचण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागरिकांचा जीव धोक्यात

शनी मंदिर ते फुलेनगर हा रस्ता परिसरातील महत्त्वाचा दुवा मानला जातो. फुलेनगरमधील शाळांमध्ये जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दररोज याच मार्गाचा वापर करावा लागतो. पुढे असलेल्या डी. वाय. पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचीही या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. याशिवाय महिला, ज्येष्ठ नागरिक, दुचाकीस्वार तसेच पादचारी यांची दिवसभर वर्दळ असते. रस्त्याच्या समोर पोळी-भाजी केंद्रांची दुकाने, इतर व्यावसायिक आणि रहिवासी घरे असल्याने या परिसरात नेहमीच गर्दी असते.

अपघाताची भीती

याच रस्त्यावरून भोसरी, मोशी आणि चाकण परिसरातील नागरिक तसेच रुग्ण वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी ये-जा करतात. याशिवाय रिक्षांचीही या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, भिंत कोसळल्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशा पार्श्वभूमीवर वायसीएम रुग्णालयाची ही भिंत अधिक खचल्यास किंवा लोखंडी ग्रील रस्त्यावर कोसळल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, रुग्ण, रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांच्यासाठी हा धोका अधिक गंभीर असल्याचे नागरिकांनी सांगितले.

मजबूत संरक्षक भिंत उभारण्याची मागणी

नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तातडीने या भिंतीची पाहणी करून धोकादायक भाग हटविण्याची, लोखंडी ग्रील सुरक्षितरीत्या काढून टाकण्याची आणि नवीन मजबूत संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली आहे.

भिंतीची पाहणी करण्यात आली आहे. भिंतीच्या आवश्यक दुरुस्ती करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. सुरक्षिततेच्यादृष्टीने त्या ठिकाणी संरक्षण टेप लावण्यात आली आहे. सैल झालेले साहित्य काढून पुन्हा काँक्रीटचे काम करावे लागणार असल्याने हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे तीन ते चार दिवस लागतील.
प्रीती बिजवे, कनिष्ठ अभियंता, ल क्षेत्रीय कार्यालय, महापालिका
या रस्त्यावर प्रवासी रिक्षांची सतत ये-जा असते. भिंत खचली किंवा ग्रील रस्त्यावर पडले तर मोठा अपघात होऊ शकतो. पावसाळ्यात धोका अधिक वाढला आहे. प्रशासनाने तातडीने भिंतीची दुरुस्ती करून रस्ता सुरक्षित करावा.
स्थानिक नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT