पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आजपर्यंत दहीहंडी फोडण्याचा मान आणि बक्षीस हे बाहेरील गोविंदा पथक घेऊन जातात. शहरात यापूर्वी एकही गोविंदा पथक नव्हते. यासाठी ताथवडे गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन शहरातील एकमेव नरसिंह गोविंदा पथक तयार केले असून, सध्या या पथकाचा दररोज रात्री ताथवडेतील नरसिंह मंदिराच्या आवारात पाच थर रचून दहीहंडी फोडण्याचा सराव सुरू आहे.
ताथवडे गावच्या ग्रामदैवताच्या नावावरुन पथकाचे नाव ठेवण्यात आले आहे. ताथवडे येथील शाळेच्या मैदानावर पथकाचा सराव सुरू आहे. सध्या पाच थराची दहीहंडीचा सराव ते करत आहेत. शहरामध्ये आता ढोल-ताशा पथकाच्याबरोबर गोविंदा पथकही तयार होवू लागले आहे. 14 ते 35 वयोगटातील गोविंदा आपली शाळा व कामे सांभाळून नित्य सराव करताना दिसत आहेत. (Latest Pimpri News)
दुखापत होऊ नये यासाठी विशेष काळजी
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील उत्सवाची धूम असणार आहे. मोठंमोठ्या सेलिब्रिटी, दहीहंडी फोडण्यासाठी मंडळांना लाखोंच्या सुपार्या दिल्या आहेत. त्यामुळे गोविंदा पथकांमध्ये चुरस असणार आहे. दहीहंडी हा एक साहसी खेळ आहे. पथकातील जाणकार सर्व गोविंदांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 1-2 महिन्यांपासून पूर्वतयारी सुरू होते. वरच्या थरातील लहान गोविंदासाठी खास प्रशिक्षण दिले जाते. थर कोसळताना दुखापत होऊ नये यासाठी पथकाकडून पूर्ण काळजी घेतली जाते.
आम्ही मुलांनीच ठरविले की गोविंदा पथक तयार करायचे आणि दोन ते तीन वर्षांतच आम्ही पाच थराची दहीहंडी रचली. यावर्षी सहा थराची दहीहंडी रचणार आहोत. यासाठी आमचे प्रशिक्षक गणेश चिकणे आणि नामदेव सकुंडे सराव घेताहेत.- राज वड्डे (सदस्य, नरसिंह गोविंदा पथक)