पिंपरी : ‘गोविंदा आला रे.. आला’, ‘एक, दोन, तीन, चार’, ‘चाँदी की डाल पर सोने का मोर’ अशा एकापेक्षा एक सरस गाणी. या गाण्यांच्या तालावर थिरकणारी तरुणाई, अशा उत्साही वातावरणात दहीहंडी फोडण्याचा थरार बघण्यासाठी शहरातील विविध भागांत गर्दी झाली होती. (Pimpari Chinchwad Latest News)
शनिवार (दि. 16) सकाळपासूनच शहरातील विविध भागात दहीहंडी साजरी करण्याची लगबग दिसून आली. दहीहंडी कार्यक्रमाला हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक सिनेतारखा, रिल स्टार यांनी हजेरी लावली होती. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांची चढाओढ आणि थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती; दहीहंडीच्या चढाओढीमधून विजयी झालेल्या गोंविदांनी बक्षीसरूपी लाखो रुपयांचे लोणी चाखले.
सायंकाळी सात वाजल्यापासून सिनेकलाकारांची हजेरी आणि गोविंदांचा ओसंडून वाहणारा उत्साह असे जल्लोषपूर्ण वातावरण शहरातील दहीहंडी उत्सवात पाहायला मिळाले. दहीहंडीसाठी श्रीकृष्ण व राधा यांचा आकर्षक फुलांचा रथ तयार करण्यात आला होता. चित्रपटातील दहीहंडीच्या गीतांवर तरुणाई थिरकत होती. सिनेतारका आणि दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी गर्दी उसळली होती.
शहर व उपनगरात राजकीय पक्षांच्या वतीने मोठ्या दहीहंडींचे आयोजन केले असून लाखोंची बक्षिसे लावली होती. या बक्षिसांची लयलूट करण्यासाठी गोविंदा पथके महिनाभरापासून सराव करीत होते.
पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी, सांगवी, पिंपळे गुरव, मोशी यासह विविध भागात मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली.
महापालिका निवडणुका काही महिन्यांतच होण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी असे सण- उत्सव म्हणजे नागरिकांसमोर येण्याची एक संधी. त्यामुळे या संधीचे सोने करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या सहाय्याने जोरदार वातावरण निर्मिती केली होती.
बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती हेही मागील काही वर्षांपासून दहीहंडीचे आकर्षण ठरत आहे. यंदाही अनेक तारे- तारका वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडीच्या स्टेजवर नागरिकांचे मनोरंजन करताना दिसले. त्यात आता रील स्टार्सचीही भर पडली आहे.