संतोष शिंदे
पिंपरी: सायबर फसवणूक टाळण्यासाठी कोणालाही ओटीपी सांगू नका, अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, अशा सूचना वारंवार दिल्या जातात, मात्र कोणताही ओटीपी शेअर केला नाही किंवा संशयास्पद लिंक उघडली नाही, तरीही बँक खात्यातून पैसे गायब झाल्याच्या तक्रारींमुळे सायबर सुरक्षेचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.
मोबाईलमध्ये नकळत इन्स्टॉल झालेल्या घातक ॲप्सच्या माध्यमातून संवेदनशील माहिती चोरून आर्थिक फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. विशेषतः अनधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केलेले गेम्स आणि थर्ड पार्टी ॲप्समुळे नागरिकांच्या बँक खात्यांना धोका निर्माण होत असल्याचे सायबर तज्ज्ञांचे मत आहे.
सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी सातत्याने नवनवीन तंत्रांचा वापर करीत आहेत. आर्थिक फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे धाव घेणारे काही तक्रारदार आपण कोणालाही ओटीपी सांगितलेला नाही, बँकेची गोपनीय माहिती दिलेली नाही किंवा कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक केलेले नाही, असे सांगतात.
त्यामुळे खात्यातून पैसे नेमके गेले कसे?, असा प्रश्न उपस्थित होतो. अशा प्रकरणांमध्ये मोबाईलमधील घातक सॉफ्टवेअर, ॲप्सना दिलेल्या परवानग्या या फ्रॉडचा महत्त्वाचा धागा ठरतो आहे.
मोफत गेम्स, फोटो एडिटिंग, चित्रपट पाहणे, आकर्षक ऑफर्स किंवा प्रीमियम सुविधांच्या नावाखाली अनधिकृत ॲप्स डाउनलोड करण्यास प्रवृत्त केले जाते. काही घातक ॲप्स इन्स्टॉल करताना एसएमएस, नोटिफिकेशन, स्क्रीनवरील मजकूर वाचणे तसेच मोबाईल नियंत्रित करण्याच्या परवानग्या मागतात.
वापरकर्त्याने विचार न करता त्या दिल्यास सायबर गुन्हेगारांना संवेदनशील माहिती मिळविण्याची संधी मिळत आहे. काही प्रकारच्या मालवेअरच्या माध्यमातून स्क्रीनवरील हालचाली पाहणे, लॉगिन माहिती चोरणे किंवा आर्थिक व्यवहारांच्या प्रमाणीकरण प्रक्रियेत हस्तक्षेप करणे शक्य होत आहे.
मोबाईलची सुरक्षा प्रणाली अद्ययावत ठेवावी
सायबर तज्ज्ञांच्या मते, मोबाईलमधील ॲक्सेसिबिलिटी, स्क्रीन शेअरिंग आणि एसएमएससंबंधी परवानग्यांचा गैरवापर गंभीर ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिकृत ॲप स्टोअरमधूनच ॲप्स डाउनलोड करावीत.
अनावश्यक परवानग्या टाळाव्यात आणि मोबाईलची सुरक्षा प्रणाली अद्ययावत ठेवावी. बँक खात्यात संशयास्पद व्यवहार आढळल्यास तत्काळ संबंधित बँकेशी संपर्क साधून खाते सुरक्षित करावे. तसेच १९३० या हेल्पलाइनवर किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. वेळीच तक्रार केल्यास फसवणुकीची रक्कम पुढे वळविण्यापूर्वी रोखणे शक्य होते.
या संकेतांकडे दुर्लक्ष नको
मोबाईलमध्ये अनोळखी ॲप्स दिसणे, वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय स्क्रीनवरील हालचाली होणे, अचानक अनपेक्षित लॉगिन अलर्ट येणे किंवा बँक खात्यात संशयास्पद व्यवहार दिसणे, ही धोक्याची चिन्हे आहेत.
अशावेळी संशयित मोबाईलचे इंटरनेट बंद करून दुसऱ्या सुरक्षित उपकरणावरून बँकेशी संपर्क साधावा. आवश्यक पासवर्ड बदलून आर्थिक व्यवहार तपासावेत. फसवणूक झाल्यास संबंधित संदेश, व्यवहारांचे तपशील आणि इतर डिजिटल पुरावे जतन करावेत.
फसवणुकीनंतर पुरावे नष्ट होण्याचा धोका
मोबाईल हॅक झाल्याच्या संशयातून अनेक नागरिक घाईघाईने मोबाईल फॉरमॅट करतात किंवा संशयास्पद ॲप्स डिलीट करतात, मात्र यामुळे सायबर गुन्ह्याच्या तपासासाठी महत्त्वाचे ठरणारे डिजिटल पुरावे नष्ट होण्याची शक्यता असते.
मोबाईलमधील ॲप्सचा इतिहास, संशयास्पद फाइल्स, लॉगिन नोंदी आणि व्यवहारांशी संबंधित तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हेगारांनी कोणत्या मार्गाने प्रवेश केला, याचा शोध पोलिसांना घेता येऊ शकतो.
त्यामुळे फसवणूक झाल्यानंतर मोबाईलमधील डेटा नष्ट करण्याऐवजी तो सुरक्षित ठेवून सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपासणी करून घेणे महत्त्वाचे असल्याचे सायबर ठाण्यातील सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.
अधिकृत ॲप स्टोअरमधूनच ॲप्स डाउनलोड करा
दरम्यान, मोबाईल अचानक गरम होणे, वारंवार हँग होणे, बॅटरी झपाट्याने संपणे किंवा आपोआप रिस्टार्ट होणे यामुळेही नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे, मात्र ही लक्षणे म्हणजे मोबाईल हॅक झाल्याचा ठोस पुरावा नाही.
तांत्रिक बिघाडामुळेही असे प्रकार घडू शकतात, मात्र मोबाईलमध्ये अनोळखी ॲप्स दिसणे, स्वतःहून स्क्रीनवर हालचाली होणे किंवा बँक खात्यात अनधिकृत व्यवहार आढळणे याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सायबर गुन्हेगार नागरिकांच्या मोबाईलमधील सुरक्षेच्या त्रुटींचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. कोणताही ओटीपी दिलेला नसतानाही घातक ॲप्समुळे वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो. त्यामुळे अनधिकृत गेम्स किंवा थर्ड पार्टी ॲप्स डाउनलोड करू नयेत. मोबाईलमधील ॲप्सना दिलेल्या परवानग्या नियमित तपासाव्यात. आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० वर तक्रार करावी.- रविकिरण नाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे