पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आणि आस्थापना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या सोसायटी व आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 अंतर्गत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या हाऊसिंग सोसायटी, हॉटेल्स, मॉल्स, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, मंगल कार्यालय, वसतीगृह, कॅण्टीन तसेच, व्यावसायिक आस्थापनांसाठी सीपीसीबीच्या पोर्टलवरील नोंदणी सक्तीची करण्यात आली आहे.
या माध्यमातून कचरा निर्मिती, विलगीकरण आणि प्रक्रियेवर केंद्रीकृत पद्धतीने देखरेख ठेवली जाणार आहे. सीपीसीबीचे केंद्रीकृत घनकचरा व्यवस्थापन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. सर्व पात्र बल्क वेस्ट जनरेटर्सनी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई
आयुक्तांनी सांगितले, की मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या हाऊसिंग सोसायट्या व आस्थापनांनी स्वतःच्या आवारात कचऱ्याचे विलगीकरण व प्रक्रिया करणे आवश्यक आहे. ओला कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती प्लाण्ट सुरू करणे बंधनकारक आहे. त्याची सीपीसीबी पोर्टलवरील नोंदणी ही कायदेशीर जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाईल.
महापालिकेकडून हाऊसिंग सोसायट्या आणि संबंधित आस्थापनांना नोंदणी व कचरा व्यवस्थापन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जात आहे. मात्र, निर्धारित कालावधीत नोंदणी न करणाऱ्या तसेच, घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन न करणाऱ्या बल्क वेस्ट जनरेटर्सवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.डॉ. प्रदीप ठेंगल, उपायुक्त, महापालिका