Pimple Gurav PMPML Bus Shelter Issue: पिंपळे गुरवमध्ये पीएमपीएलचा नियोजनशून्य कारभार; कोट्यवधींच्या बसशेड असूनही प्रवासी उन्हात

बसमार्ग बदलामुळे प्रवाशांचे हाल; सुसज्ज बसशेड धूळ खात तर नागरिक पदपथावर उभे
Pimple Gurav PMPML Bus Shelter
Pimple Gurav PMPML Bus ShelterPudhari
Published on
Updated on

उमेश सणस

पिंपळे गुरव: पिंपळे गुरवमध्ये पीएमपीएल प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका हजारो प्रवाशांना बसत आहे. एका बाजूला लाखो रुपये खर्च करून उभारलेले सुसज्ज बसशेड धूळ खात पडून आहेत, तर दुसऱ्या बाजूला नागरिकांना भर उन्हात पदपथावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत असल्याचे विदारक चित्र सध्या पिंपळे गुरव येथे पाहायला मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बसमार्ग बदलल्याने प्रवाशांमध्ये तीव नाराजी व्यक्त होत आहे.

Pimple Gurav PMPML Bus Shelter
Bhama Askhed Water Project: भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्प पुन्हा रखडला; इंद्रायणीतील काम पावसाच्या धोक्यात

आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा भवन, पिंपरी गाव ते मार्केट यार्ड, भोसरी ते भेकराईनगर, भोसरी ते कोथरूड डेपो, आळंदी ते म्हाळुंगे या विविध मार्गांवरील पीएमपीएल बसेस पूर्वी तुळजाभवानी मंदिराच्या अलीकडील मार्गाने जात, पिंपळे गुरव बसस्थानकाबाहेरील थांब्यावर थांबत होत्या. त्या ठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी दोन-दोन बस शेडही उभारण्यात आले होते. मात्र, पीएमपीएल प्रशासनाने अचानक बसमार्गात बदल करत बसेस तुळजाभवानी मंदिराच्या पलीकडील बाजूने वळविल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

Pimple Gurav PMPML Bus Shelter
Pune Toxic Liquor Death: सांगवीत विषारी दारूमुळे तरुणाचा मृत्यू; मामाच्या मायेला मुकलं बाळ

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न

नव्या थांब्याच्या ठिकाणी प्रवाशांना पदपथावर उभे राहावे लागत असल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे. रहदारीचा रस्ता असल्याने वाहने जोरदार येतात. यामुळे प्रवाशांना रस्त्याच्या कडेला जीवमुठीत धरून बसची वाट पाहवी लागत आहे. पावसाळा तोंडावर आला असताना अद्याप कोणतीही तात्पुरती शेड किंवा संरक्षणाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात नागरिकांचे हाल आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

नागरिकांची प्रमुख मागणी

  • बसेसचा मार्ग पुन्हा पूर्वीप्रमाणे तुळजाभवानी मंदिराच्या अलीकडील मार्गाने सुरू करावा.

  • नव्या थांब्याच्या ठिकाणी तातडीने सुसज्ज बस शेड उभारावे.

  • प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी योग्य थांबा आणि वाहतूक व्यवस्थापन करावे.

  • महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

Pimple Gurav PMPML Bus Shelter
Pimpri Chinchwad Garbage Problem: पिंपरीत स्वच्छतेचे फलक असूनही कचऱ्याचे ढीग; स्मार्ट शहर दाव्यांवर प्रश्नचिन्ह

सावली एका बाजूला अन्‌‍ प्रवासी दुसऱ्या बाजूला

मार्ग बदलल्यामुळे नव्या थांब्यावर कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना थेट पदपथावर उभे राहून बसची वाट पाहवी लागत आहे. उन्हाच्या तीव झळा, वाहतुकीची गर्दी आणि सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. विशेषतः महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पूर्वी ज्या मार्गावरून बसेस धावत होत्या त्या ठिकाणी लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेली दोन-दोन बस शेड आता ओसाड अवस्थेत धूळ खात उभी आहेत. एका बाजूला रिकामी बस शेड आणि दुसऱ्या बाजूला उन्हात ताटकळणारे प्रवासी असे विसंगत आणि संतापजनक चित्र सध्या येथे पाहायला मिळत आहे.

Pimple Gurav PMPML Bus Shelter
Pimpri Industry AI Impact: पिंपरी उद्योगनगरीत कामगार टंचाई; एआयमुळे व्यवसायांचे स्वरूप बदलतेय

पिंपळे गुरव बसस्थानकाचा सर्वे पूर्ण झाला आहे. परिसरात नो पार्किंगचे फलक लावण्यात आले आहेत. बसस्थानकाच्या आसपास वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृतपणे पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाला पत्रही देण्यात आले आहे. सध्या बाहेर थांबणाऱ्या प्रवाशांना पुढील काळात बसस्थानकाच्या आतमध्ये थांबता येणार आहे.

रामदास विरणक, सहाय्यक आगार व्यवस्थापक, पिंपरी आगार.

दररोज कामासाठी बसने प्रवास करावा लागतो. पूर्वी बसशेड असल्यामुळे उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण मिळत होते. आता मात्र पदपथावर ताटकळत उभे राहावे लागते. महिला आणि लहान मुलांसह इतर प्रवास करणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

शीतल पाटील, महिला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news