अनेक इच्छुकांचे नगरसेवकपद ठरणार दिवास्वप्न; जनगणना न झाल्याने 15 वर्षांपासून महापालिकेतील नगरसेवक संख्या पूर्वीचीच Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri News: अनेक इच्छुकांचे नगरसेवकपद ठरणार दिवास्वप्न; जनगणना न झाल्याने 15 वर्षांपासून महापालिकेतील नगरसेवक संख्या पूर्वीचीच

सध्याची लोकसंख्या- 32 लाख; शहरातील मतदार-17 लाख 751

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे. या निवडणुकीसाठी सन 2011च्या लोकसंख्येनुसार 32 प्रभागांची रचना करण्यात आली आहे. गेल्या पंधरा वर्षांत शहराच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून, ती 32 लाखांपर्यंत गेली आहे. त्यामुळे मतदारांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे; मात्र सन 2021 मध्ये जनगणना न झाल्याने नगरसेवक संख्येत वाढ झाली नाही. यामुळे यंदा अनेक इच्छुक नगरसेवक होण्यापासून वंचित राहणार आहेत. (Latest Pimpri News)

महापालिकेची स्थापना 11 ऑक्टोबर 1982 ला झाली. त्यानंतर 26 मार्च 1986 पर्यंत महापालिकेवर प्रशासक होते. दोन मार्च 1986 मध्ये 60 वॉर्डसाठी महापालिकेची पहिली निवडणूक झाली. त्यानंतर सन 1992 व 1997 ला एक वॉर्ड याप्रमाणे निवडणूक झाली. फेब्रुवारी 2002 मध्ये तीन सदस्यीय पद्धतीने निवडणुका झाल्या.

या वेळी 35 प्रभाग होते. त्यानंतर फेब्रुवारी 2007 ला एक सदस्य आणि फेब्रुवारी 2012 ला दोन सदस्यीय पद्धतीने निवडणुका झाल्या. फेब्रुवारी 2017 ला चार सदस्यीय निवडणूक झाली. त्याच प्रभागरचना कायम ठेवून यंदाही चार सदस्यीय निवडणूक होत आहे.

कोरोना महामारीमुळे सन 2021ची जनगणना झाली नाही. सन 2011 झालेल्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 17 लाख 27 हजार 359 होती. त्यामध्ये पुरुष 9 लाख 45 हजार 943 व महिलांची संख्या 7 लाख 83 हजार 406 होती.

गेल्या पंधरा वर्षांत ही लोकसंख्या सुमारे 15 लाखाने वाढून 32 लाखांजवळ गेली आहे. जनगणना न झाल्याने सन 2011 च्या जनगणनेनुसारच प्रभागांची रचना करण्यात आली आहे. त्यानुसार, प्रभागाची संख्या पूर्वीप्रमाणे 32 राहणार असून, नगरसेवकांची संख्याही 128 इतकीच आहे.

दुप्पटीपेक्षा अधिकने लोकसंख्या वाढली तरी, नगरसेवक संख्येत वाढ झाली नाही. प्रभाग संख्येत वाढ न झाल्याने इच्छुकांतील अनेकांना यंदा नगरसेवक होता येणार नाही. त्यांना आणखी पाच वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा इच्छुकांवरील एक प्रकारचा अन्यायच म्हणावा लागेल, असे जाणकारांचे मत आहे.

जुनीच लोकसंख्या असल्याने प्रभागरचनाही पूर्वीची :

सन 2011च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची प्रभागरचना तयार करण्यात आली आहे. सन 2021 जनगणना न झाल्याने त्या लोकसंख्येची आकडेवारी उपलब्ध नाही. लोकसंख्या जुनी असल्याने प्रभागरचनाही जुनीच ठेवण्यात आली आहे. कोणाला प्रभाग रचनेवर हरकती किंवा सूचना द्यायच्या असतील, त्यांनी सादर कराव्यात, असे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

तिसरी निवडणूक आली तरी, नगरसेवक 128

महापालिकेची तिसरी निवडणूक होत आहे. शहराची लोकसंख्या दुप्पट होऊन 32 लाखांपर्यंत पोहचली आहे. असे असताना सलग तिसर्‍या निवडणुकीत 128 इतकेच नगरसेवक संख्या आहे. त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. नगरसेवक संख्येत वाढ न झाल्याने एका नगरसेवकांला मोठ्या क्षेत्रफळातील दाट लोकवस्तीच्या प्रभागात काम करण्याची पाळी आली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नगरसवेकांवर कामाचा ताणही वाढणार आहे.

प्रभागरचना सत्ताधार्‍यांच्या मर्जीनुसार?

राज्यात असलेल्या सत्ताधारी भाजपाच्या मर्जीनुसार फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीसाठी प्रभागरचना तयार करण्यात आली होती. भाजपाचे लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांच्या कलेनुसार जुनी प्रभागरचना फोडण्यात आली. त्या निवडणुकीत भाजपाचे 77 नगरसेवक निवडून आले. भाजपाने सत्ता काबीज केली. त्या वेळेची प्रभागरचनेत कोणताही बदल न करता ती यंदा कायम ठेवण्यात आली आहे. साहचिकच या प्रभागरचनेचा भाजपाला फायदा होईल, असा दावा केला जात आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून नगरसेवक संख्येत 11 ने वाढ

कोरोना महामारीमुळे सन 2021ची जनगणना झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 टक्के लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेची नगरसेवक संख्या 128 वरून 139 केली होती. लोकसंख्येच्या प्रमाणात एकूण 11 नगरसेवक वाढविण्यात आले होते.

तर, चार सदस्यीय 32 प्रभागांचे तीन सदस्यीय एकूण 46 प्रभाग करण्यात आले होते. ती प्रारुप प्रभाग रचना 1 फेब्रुवारी 2022 ला प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर तब्बल 5 हजार 684 हरकती प्राप्त झाल्या. सुनावणीनंतर अहवाल 2 मार्च 2022 ला राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आल्या. त्यानंतर निवडणुकीबाबत न्यायालयात वाद गेल्याने ती निवडणूक स्थगित करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT