चर्होली: मे महिन्यात सुरू झालेला पाऊस अद्याप दररोज हजेरी लावत आहे. यामुळे चर्होली परिसरातील उन्हाळी पिकांचे तर नुकसान झालेच; परंतु मृग नक्षत्रात पेरणी केलेली पिकेदेखील धोक्यात आली आहेत. सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तरकारी पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामुळे चर्होली परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
गेले दोन, तीन वर्षांपासून पावसाचा पॅटर्न बदलला आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी सारखा पाऊस न पडता एकाच ठिकाणी आणि कमी वेळेत जास्त पाऊस पडतो आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. आधी कांद्याचे पीक आणि उन्हाळी बाजरी या दोन्ही हक्काच्या पिकांचे मोठे नुकसान अवकाळी पावसामुळे झाले. कारण सलग पाऊस पडत राहिल्यामुळे पिके डोळ्यासमोर दिसत असूनदेखील काढता येईनात. (Latest Pimpri News)
नंतर पाऊस उघडला मात्र शेतात इतकं पाणी साचून राहिले होते की कांदा जागेवरच सडून गेला आणि बाजरीचे पीकदेखील पूर्ण पिवळे पडले. त्यानंतर नवीन पिकासाठी वावर मोकळे करायचे म्हणून शेतकर्यांनी पहिले पीक नुकसान सोसून काढून टाकले. पण वापसा नसल्याने मशागतीची कामे करता येईना. त्यामुळे पुन्हा बरेच दिवस वापसा होण्याची वाट बघण्यात शेतकर्यांची निघून गेली. त्यानंतर सलग पाऊस पडल्यामुळे पेरणीची तयारी असूनदेखील पेरणी करता येईना.
कारण पावसाचा काहीच अंदाज लागत नव्हता. समाज माध्यमांमधून लगेच पेरणीची घाई करू नका, असा संदेश दिला जात होता; कारण पुढे पाऊस पडणार नाही असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, प्रत्यक्षात नंतरदेखील भरपूर पाऊस पडला. त्यामुळे काही ठिकाणी सोयाबीनचे पीक चांगले आले.
मात्र वांगी, भेंडी तसेच जनावरांच्या चार्यासाठी राखून ठेवलेली ताज्या चार्याची पिके मात्र पावसामुळे पूर्ण पिवळी पडली. त्यामुळे आता पुढील काळात जनावरांच्या चार्याचा मोठा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहणार आहे. त्याची आर्थिक तरतूद करताना शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.
वांग्यावर आळीचा प्रादुर्भाव
यंदा जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वांगी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वांग्यावर सतत पडणारा रोग आणि आळी यामुळे शेतकर्र्याचा औषध फवारणी करण्यातच पैसा व्यर्थ गेला. वांग्यावरील रोगराईमुळे उत्पादन कमी मिळू लागल्याने बाजारात वांग्याला भाव मिळत आहे; परंतु बळीराजाकडे वांगी नसल्याने त्याचा फारसा फायदा होत नाही. वांग्याच्या पिकावर कीड पडल्यामुळे शेतकर्यांना अक्षरशः तोडीला आलेली वांगी बांधावरच फेकून द्यावी लागत आहेत. त्यामुळे बाजारभाव असून आणि पिके येऊनसुद्धा काहीच उपयोग झाला नाही.
यंदा पाऊस जास्त पडल्यामुळे शेतातील वांग्यावर मोठ्या प्रमाणावर कीड पडली आहे. औषध फवारणी करताना शेतकर्यांचे आर्थिक गणित बिघडले. औषध फवारणी करूनसुद्धा किडीमुळे मोठ्या प्रमाणावर वांगी फेकून द्यावी लागली. शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेली आणि फेकून द्यावी लागणार्या वांग्यांमुळे शेतकर्यांचे दुहेरी नुकसान झाले. शिवाय शेतात वापसा नसल्यामुळे पुढील पेरण्या देखील खोळंबल्या.- अरुण रासकर, शेतकरी चर्होली.