उद्योगनगरीतील बंद पडक्या कंपन्या मद्यपी, गर्दुल्ल्यांचे अड्डे Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri: उद्योगनगरीतील बंद पडक्या कंपन्या मद्यपी, गर्दुल्ल्यांचे अड्डे

या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या इमारती परिसरात सक्तीने गस्त घालण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

पुढारी वृत्तसेवा

संतोष शिंदे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील औद्योगिक क्षेत्रात बंद पडलेल्या अनेक कंपन्यांमध्ये मद्यपी, गर्दुल्ले, जुगारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींची वर्दळ दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी या इमारती परिसरात सक्तीने गस्त घालण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या आदेशानुसार पोलिस रेकॉर्डवर असलेल्या 68 बंद पडक्या कंपन्यांवर आता अधिक प्रभावी गस्त सुरू करण्यात आली आहे.

उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक लघुउद्योग, फॅक्टर्‍या विविध कारणांमुळे बंद पडल्या असून, त्यांच्या इमारती, पटांगण आणि खोल्या पूर्णपणे दुर्लक्षित आहेत. पोलिसांच्या नोंदीनुसार शहरात सध्या 68 बंद पडक्या कंपन्या असून, त्या पूर्णपणे सुरक्षारहित आहेत. (Latest Pimpri News)

यामुळे त्याठिकाणी दारू पिणे, गांजा ओढणे, चोरीचे सामान लपवणे, जुगार यासह इतर बेकायदा कृत्ये सर्रास सुरू असतात. काही ठिकाणी अनैतिक संबंध, लैंगिक शोषणासाठीही बंद कंपन्या वापरल्या जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

या धोकादायक प्रवृत्तींवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी पाऊल उचलले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बंद कंपन्यांची यादी तयार करून, त्यांच्या ठिकाणी बीट मार्शल, नाईट पेट्रोलिंग टीम आणि गुन्हे शाखेचे अधिकारी नियमितपणे तपासणी करतील, असे आदेश त्यांनी दिले आहेत. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळून आल्यास त्वरित कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत.

बंद पडक्या इमारतीत लपवला मृतदेह

भोसरी एमआयडीसीतील एका बंद इमारतीच्या टेरेसवर सात वर्षीय आदित्य ओगले या चिमुरड्याचे अपहरण करून खून करण्यात आला होता. 9 सप्टेंबर 2022 रोजी ही घटना घडली होती. आदित्यचे वडील गजानन ओगले यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मंथन भोसले व अनिकेत समदरे या दोघांना 24 तासांत अटक करण्यात आली होती. आरोपींनी आदित्यचा मृतदेह बंद इमारतीच्या टेरेसवर लपवला होता. दरम्यान, रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी आरोपींना संशयास्पद अवस्थेत ताब्यात घेतले होते. त्यांनी सिगारेट ओढण्यासाठी आलो होतो, असे सांगत सुटका करून घेतली होती. मात्र, पुढील तपासात खुनाचा पर्दाफाश झाला होता.

चोरट्यांसह देहविक्री व्यवसाय

काही बंद पडक्या कंपन्यांमध्ये चोरीच्या दुचाकी किंवा वाहनांचे भाग काढणे, असे प्रकार केले जातात. तृतीयपंथी आणि वेश्या देहविक्री करण्यासाठीदेखील अशा कंपन्यांचा वापर करतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी महापालिकेसोबत संयुक्तपणे ही ठिकाणे सीलबंद करणे, परिसरात सीसीटीव्ही बसवणे आणि सुरक्षा भिंती उभारणे गरजेचे आहे.

पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार बंद पडक्या कंपन्या आणि निर्जन स्थळांवर नियमित गस्त सुरू आहे. स्थानिक नागरिकांना काही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी. या ठिकाणांवर त्वरित कारवाई करण्यासाठी पोलिस गस्त अधिक प्रभावी केली आहे.
- गणेश जामदार, वरिष्ठ निरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलिस ठाणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT