पिंपरी: शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले असून, गेल्या पाच दिवसांत डेंग्यूचे ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर २८४ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
शहरातील विविध भागांत हे रुग्ण आढळले असून, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.
पावसाळ्यानंतर साचलेले पाणी, घरातील कुंड्या, कुलर, टाक्यांमध्ये साचलेले स्वच्छ पाणी यात डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ज्या भागात रुग्ण आढळले, त्या ठिकाणी धूर आणि औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.
नागरिकांनी घरात व परिसरात पाणी साचू देऊ नये, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, अंग झाकणारे कपडे घालावेत, ताप आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.