पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात गेले दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे जाहिरात होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. होर्डिंगच्या स्ट्रॅक्चरचे तपासणी करून घ्यावी.
धोकादायक स्ट्रक्चरची दुरूस्ती करून घ्यावी, अशा सक्त सूचना महापालिकेने होर्डिंगचालक व धारक तसेच, जाहिरादारांना केली आहे. तसेच, होर्डिंग खाली नागरिकांनी थांबू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (Latest Pimpri News)
शहरात विविध ठिकाणी, विविध आकाराचे आणि उंचीचे अवजड असे लोखंडी जाहिरात होर्डिंग उभारण्यात आलेले आहेत. प्रतिवर्षी वादळ, वार्यामुळे असे जाहिरात होर्डिंग पडण्याचे प्रकार शहरात व शहराबाहेर घडलेले आहेत.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने यापूर्वीच सर्व जाहिरातदार यांना मान्सुनपूर्व कालावधीत सर्व जाहिरात होर्डिंगची प्रत्यक्ष जागेवर जावून तपासणी करणे. त्याचे फाउंडेशन व्यवस्थित असल्याचे, होर्डिंगच्या लोखंडी सांगाड्यास गंज लागला नसल्याची खात्री करावी.
त्यास गंजरोधक रंग लावावा. एखादे होर्डिंग धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्यास तो तात्काळ ते पाडून घ्यावे. जाहिरात होर्डिंग वादळ, वार्यामुळे पडणार नाही, यासाठीच्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
होर्डिंगखाली थांबू नका
नागरिकांनी अवकाळी पावसाच्या कालावधीत अशा जाहिरात होर्डिंगच्या सांगाड्याखाली किंवा होर्डिंगच्या आसपास थांबण्याचे टाळावे. आपली वाहने लावू नयेत. होर्डिंगखाली टपरी, हातगाडी, पत्राशेड लावून कोणी व्यवसाय करीत असल्यास ते ताबडतोब काढून घ्यावे. जेणेकरुन जीवित अथवा वित्तीय हानी होणार नाही. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी केले आहे.