Pune Crime News
अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या वाटेवर; चार महिन्यांत 192 घटनांनी पोलिस दलात खळबळ File Photo

Pimpri Crime: अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या वाटेवर; चार महिन्यांत 192 घटनांनी पोलिस दलात खळबळ

ही आकडेवारी चिंतेची घंटा
Published on

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात चालू वर्षाच्या अवघ्या चार महिन्यांत 192 अल्पवयीन मुलांचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग आढळून आल्याने पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. सन 2024 मध्ये ही संख्या 362 इतकी होती. ही आकडेवारी चिंतेची घंटा ठरत असून अल्पवयात गुन्हेगारीच्या वाटेवर वळणारी पिढी समाजासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये देशभरातून रोजीरोटीसाठी आलेले नागरिक स्थायिक झाले आहेत. यातील बहुसंख्य कुटुंबांचे वास्तव्य झोपडपट्ट्यांमध्ये असून त्यांची उपजीविका दैनंदिन मजुरी, छोट्या व्यवसायांवर अवलंबून आहे. कामाच्या व्यापामुळे अनेक पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. (Latest Pimpri News)

Pune Crime News
PCMC News: मुदत संपूनही पिंपरी चिंचवड शहरात रस्ते खोदकाम सुरूच

याच निष्काळजीपणाचा परिणाम म्हणून या मुलांना वाईट संगत, व्यसन, चुकीचे आकर्षण वाटल्याने ती मुले गुन्हेगारीकडे वळतात. काही गुन्हेगारी टोळ्यांनी तर अल्पवयीन मुलांचा थेट गुन्ह्यांसाठी वापर केल्याचे प्रकार शहरात उघडकीस आले आहेत.

म्हणून मुले भरकटतात...

घरगुती तणाव, सततचे भांडण, आई-वडिलांमध्ये संवादाचा अभाव, विभक्त कुटुंबव्यवस्था, व्यसनाधीनता, शिक्षणात अपयश, शाळा सोडणे, शिक्षकांचे दुर्लक्ष, चुकीचा मित्रपरिवार आणि समाजात वाढलेला भेदभाव ही बालगुन्हेगारीला कारणीभूत ठरणारी मुख्य कारणे आहेत.

याशिवाय, सध्या लोकप्रिय असलेल्या हिंसक वेब सिरीज, अ‍ॅक्शन गेम्स आणि चित्रपटांचे अनुकरण करण्याचा कलही मुलांच्या मनावर दुष्परिणाम करतो. आर्थिक अडचणी, मूलभूत गरजांची कमतरता आणि लवकर पैसा कमवायचा मोहही अनेकांना गुन्हेगारीकडे ढकलतो.

Pune Crime News
Geo Tagging for school: जिओ टॅगिंगच्या माध्यमातून शाळांवर ’वॉच’; एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती

किरकोळ वादांतून खुनापर्यंत मजल

मागील काही आठवड्यांतील घटनांवर नजर टाकली तर, चिखली, आळंदी, पिंपरी आणि दिघी परिसरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

किरकोळ वाद, जुन्या दुश्मनीची भावना किंवा फक्त सिगारेट न दिल्याचा राग यामुळे हत्या झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. संत तुकारामनगर येथे मोबाईल गेम खेळताना झालेल्या वादातून 16 वर्षीय मुलाचा खून करण्यात आला. या घटनांनी केवळ पोलिसांनाच नव्हे तर पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजालाच हादरवून टाकले आहे.

‘दिशा’तून सकारात्मक वळण

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या समस्येवर उपाय शोधत दिशा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत शाळाबाह्य, व्यसनाधीन आणि गुन्ह्यांत अडकलेल्या मुलांचे समुपदेशन केले जाते. विविध स्पर्धा, कला, संगीत, खेळ, मार्गदर्शन सत्रांद्वारे मुलांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. काही पोलिस ठाण्यांतून फुटबॉल टीम स्थापन करून मुलांचे लक्ष खेळाकडे वळवले जात आहे. आतापर्यंत या उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे 450 मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

सुदृढ पिढी घडवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

बालगुन्हेगारी रोखण्यासाठी केवळ पोलिसच नव्हे, तर पालक, शिक्षक, समाजसेवक, स्थानिक संस्था, शाळा आणि सरकार यांच्यासह संपूर्ण समाजाने पुढाकार घ्यायला हवा. झोपडपट्टीसारख्या भागात विशेष लक्ष देत समाजसेवक व मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने जनजागृती आणि भावनिक समुपदेशन आवश्यक आहे.

पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा, त्यांच्या संगतीवर व मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे. शाळांनी केवळ अभ्यासापुरते शिक्षण न देता नैतिकता, सामाजिक जबाबदारी, कायद्याचे भान आणि समुपदेशन देणारे उपक्रम राबवावेत. सरकारने दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक, आर्थिक मदतीच्या योजना अधिक व्यापकपणे अंमलात आणाव्यात.

18 वर्षांखालील मुलांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचे पालकांसह समुपदेशन केले जाते. संबंधित मुलाची मानसिकता समजून घेत त्यानुसार त्याला सुधारण्यासाठी योग्य दिशा देण्याचे काम ‘दिशा’ उपक्रमाद्वारे केले जाते. आतापर्यंत अनेक मुलांना नवसंजीवनी मिळाली आहे.

- विशाल हिरे, सहायक पोलिस आयुक्त, विशेष बाल पथक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news