मोशी : चर्होली परिसरात मागील पाच-सहा दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, वाडी-वस्तीवर राहणार्या बहुतांश नागरिकांना तो दिसूनही आलेला आहे. स्थानिकांनी वन विभागाला तत्काळ कळविले आहे. मात्र, दोन दिवसांनंतरही काहीच हालचाल केली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. (Pcmc Latest News)
बिबट्या जोपर्यंत जेरबंद होत नाही, तोपर्यंत मुलांनाही शाळेत पाठवणार नसल्याचे पालकांनी ठरविल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभागाने गांभीर्याने बिबट्याचा शोध घेऊन जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
चर्होली गावच्या पश्चिम बाजूचा डोंगराळ, तसेच बागाईत शेतीचा परिसर असल्यामुळे नागरिकांची वर्दळ असते. गावाला लागूनच शिक्षण संस्था असून, वाडी-वस्तीत महापालिकेच्या शाळा आहेत. बिबट्याच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेदेखील बंद केलेले आहे. किंबहुना बिबट्या जोपर्यंत वन विभागाकडून जेरबंद करण्यात येणार नाही, तोपर्यंत तरी पालक आपल्या विद्यार्थ्याला शाळेत पाठवण्यासाठी तयार नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानदेखील होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वन विभागाच्या संबंधित अधिकार्यांनी या तक्रारीची दखल घेऊन बिबट्यास तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे. तसेच, वन विभागाच्या अधिकार्यांनी तत्काळ कारवाई न केल्याने संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी माजी महापौर नितीन काळजे, सचिन तापकीर, तनिष प्राईड सोसायटी बुर्डेवस्ती, के. मिडास, श्रीराम कॉलनी, ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.