गणेश विनोदे
वडगाव मावळ : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरसभेत आजी-माजी आमदारांनी केलेले वक्तव्य म्हणजे ‘रात गई बात गई’ अशी स्थिती झाली असून, त्या वक्तव्याच्या वेळी ज्या पंचायत समिती गणाचा उल्लेख झाला, तसेच पंचायत समिती सभापती पदासाठी मानकरी त्याच चांदखेड गणातून आजी-माजी आमदारांनी आपापल्या पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची नावे जाहीर करून स्वबळाचा नारळ फोडला आहे.(Latest Pimpri chinchwad News)
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार सुनील शेळके यांनी माजी राज्यमंत्री भेगडे यांचे स्वागत करत आम्ही दोघ एकत्र आलो तर मावळ तालुका महाराष्ट्रात एक नंबर होईल, अशी टिपण्णी केली. तसेच, आगामी निवडणुकांसाठी मी हात पुढे करतो, टाळी द्यायची की नाही हे तुम्ही ठरवा, असे थेट आवाहन केले. यावर बोलताना माजी राज्यमंत्री भेगडे यांनीही लगेच तुम्ही एक हात दिला आम्ही दोन हात देतो, आपण निवडणुकाच बिनविरोध करू, असे स्पष्ट करत प्रतिसाद दिला होता. तसेच, भेगडे यांनी या वेळी चांदखेड गणातील राष्ट्रवादीच्या एका इच्छुकाचा नामोल्लेख करत बिनविरोध करण्यासाठी आवाहनही केले होते.
तळेगाव दाभाडे येथे झालेल्या नगर परिषद इमारत लोकार्पणप्रसंगी आमदार सुनील शेळके व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर याबाबत पुढे कोणतीही कार्यवाही किंवा साधी चर्चाही झाली नाही; परंतु दिवाळीच्या सुट्यांमध्ये सर्वसामान्य जनता व राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मात्र या वक्तव्याबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते. त्यामुळे आजी-माजी आमदारांनी केलेले वक्तव्य म्हणजे दिवाळीच्या सुटीत चर्चा करण्यासाठी दिलेला दिवाळी फराळ होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
आमदार शेळके यांनी त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादीकडून सुनीता मनोज येवले यांना चांदखेड पंचायत समिती गणातील अधिकृत उमेदवारी जाहीर करत तालुक्यातील राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर केला. त्यानंतर रविवारी माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांनीही एका कार्यक्रमात चांदखेड गणातील भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून सुवर्णा बाळासाहेब घोटकुले यांची उमेदवारी जाहीर केली. एकंदर, आजी-माजी आमदारांनी भर सभेत केलेल्या वक्तव्यानंतर आजी-माजी आमदार एकत्र येणार, महायुती होणार, अशा चर्चा सुरू झाल्या. प्रत्यक्षात मात्र सभा संपली आणि त्यानंतर आजतागायत या विषयावर चर्चाही नाही आणि साधा प्रस्तावही नाही. उलट दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. त्यामुळे सभापती पदासाठी मानकरी असलेल्या चांदखेड गणातूनच भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा स्वबळाचा नारळ फुटला असल्याचे दिसते.