पिंपरी : चाकण येथील वाढती वाहतूक कोंडी आणि अयोग्य वाहतूक नियोजनाच्या विरोधात ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीच्या वतीने गुरुवारी (दि. 9) सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत चाकणहून पीएमआरडीए कार्यालय, आकुर्डी येथे पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेसाठी तात्पुरते निर्बंध लावले असून, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. (Latest Pimpari chinchwad News)
वाहतूक विभागाने नागरिकांना नमूद कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोर्चा मार्गावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारीदेखील तैनात करण्यात आले आहेत.
निर्बंध सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत लागू राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलिस, तसेच शासकीय आपत्कालीन सेवांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
काचघर चौक - भेळ चौक - संभाजी चौक (प्रकाश बबूराव पाटील चौक) - बिजलीनगर बिज या सर्व्हिस रस्त्यावरून येण्या-जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे.
पर्यायी मार्ग : या मार्गावरील वाहने मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जाऊ शकतील.
प्रकाश बबूराव पाटील चौक ते पीएमआरडीए कार्यालय आकुर्डी या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : वाहने एलआयसी कॉर्नरमार्गे वळविण्यात येणार आहेत.
ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्पुरते निर्बंध लावण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे.- डॉ. विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग.