पिंपरी: चाकण बाजारपेठेतील एका ज्वेलर्सचे दुकान 22 एप्रिल रात्री परराज्यातील टोळीने फोडले. दुकानामधून आरोपींनी 77 लाख 22 हजार रूपये किंमतीचा ऐवज व रोख रक्कम लंपास केली. पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनने सीसीटीव्ही फुटेची पाहणी करून गुजरात राज्यापर्यंत मागोवा घेत आरोपींना ताब्यात घेत, 30 लाख 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत सुमेरमल वंजारा (35, रा. विशाल पार्क, चाकण बाजारपेठ) हे बुधवारी आपल्या दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानात आल्यावर त्यांना दुकान फोडल्याचे दिसून आले. दुकानातील 77 लाख 22 हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व रोख चोरट्यांनी लंपास केली. याविरोधात त्यांनी चाकण पोलिसांत फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, आरोपी नाशिक मार्गावरून गुजरात राज्यात गेल्याचे तपासणात आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी गुजरात गाठून तपास करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
आरोपी हिम्मतकुमार रोशनजी साळवी (37 रा. गुजरात), मुकेश उर्फ अजय भैरूलाल सालवी (24, रा. राजस्थान), राधेशाम भैरूलाल साळवी (22, राजस्थान), पुखराज ओमप्रकाश लौहार (21, रा. राजस्थान), या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच चोकशीमध्ये त्यांनी आणखी दोन मित्र सुमीत राजुभाई बंगाली आणि कालू या सर्वांनी कारमधून चाकण गाठत येथील ज्वेलर्सचे दुकान फोडून दुकानातील ऐवज लंपास केल्याचे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना दुकानातील कामगार किशन रामलाल सोनी (22, रा. चाकण, मूळ राजस्थान) याने माहिती देवून चाकणमध्ये बोलावून घेतले; तसेच दुकानाची चावी दिली. त्यानुसार आरोपींनी गॅस कटरच्या सहाय्याने आतील शटर तोडून दुकानात प्रवेश करीत चोरी केली. त्यातील काही मुद्देमाल राजू तर काही सुमित बंगाली व कालू यांस दिला. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार, दागीने असे एकुण 30 लाख 20 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपींकडून जप्त केला आहे.