पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या चाकणकडे ऑटोमोबाईल हब म्हणून पाहिले जात आहे. येथील औद्योगिकरणाला चालना मिळण्यासाठी राज्य शासनाकडून पायाभूत सुविधांची कामे सुरू करण्यात आली आहेत. आगामी काळात चाकण परिसरात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांसाठी या सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात भविष्यात या परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. तसेच पूर्वीच्या रस्त्यांचे रुंदीकरण, नाल्यांची दुरुस्ती ही कामेदेखील हाती घेण्यात येत आहे. या कामांमुळे परिसरातील उद्योजकांना दिलासा मिळत आहे.
चाकणमध्ये राज्यातून विविध भागातून रोजगारासाठी सुमारे 3 ते 4 लाख कामगार स्थायिक झाले आहेत. गेल्या 30 वर्षात चाकणचा वाढत्या औद्योगिकरणामुळे राज्यात चाकण हे औद्योगिक, ॲटोमोबाईल हब ओळखले जावू लागले. राज्य औद्योगिक विकास महामंडळाने संपादीत केलेली जमिन तसेच, खासगी जमिनीवर देखील औद्योगिक वसाहती उभारल्या गेल्या आहेत. त्यामुळे या कंपन्या, कारखान्यांना मालाची ने-आण करण्यासाठीच्या रस्त्यांचे कामे झाली नाहीत; मात्र येथील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यामुळे त्या कंपन्याना विविध कच्चा माल व इतर वस्तू पुरवठा करण्यासाठी इतर छोटया कंपन्या उभारल्या. दरम्यान, ही औद्योगिकनगरी वाढत जात असताना पायाभूत सुविधांकडे लक्ष देण्यात आले नव्हते. परिणामी, अरुंद रस्ते, राजकीय अनास्था आणि एकूणच एमआयडीसीच्या दुर्लक्षाने चाकणमध्ये वाहतूक कोंडी मोठी समस्या उद्भवली. अनेक उपाययोजना, नियोजन करुन देखील प्रश्न सुटले नाही. उलट वाढत गेले.
दरम्यान, पीएमआरडीएकडून पाच तर, एमआयडीसीकडून तीन अशा आठ रस्त्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या कामांबाबतची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तर, एमआयडीसीकडून देखील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पीएमआरडीएकडून खेड तालुक्यात धामणे फाटा ते कोये स्कूल, कोहिंडे फाटा ते कडूस, कडूस ते किवळे, भोसे ते वडगाव घेणंद आणि किवळे ते आंबेठाण अशा 14 किलोमीटर लांबीची रस्त्यांची कामे येत्या महिनाभरात सुरु होतील. यासाठी पीएमआरडी पावणे दोनशे कोटी खर्च करणार आहेत.
पार्किंग प्रश्नावर तोडगा काढणार
चाकण औद्योगिक परिसरात बेशिस्त पार्किंग, रस्त्यावर उभी राहणाऱ्या अवजड वाहनांमुळे परिसरात वाहतूक कोंडी उद्भवते. यावर उपाययोजना म्हणूण एमआयडीसीकडून परिसरात वाहन पार्किंग उपलब्ध करण्यात आले आहे. तेथे शंभरहून अधिक अवजड वाहने थांबू शकतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ते सुधारण्यासाठी एमआयडीसी प्रयत्नशील आहे.
चाकण परिसरातील अंतर्गत तसेच, काही रस्त्यांचे रुंदीकरणाचे कामकाज सुरु आहे. येत्या काही दिवसांत ती कामे पूर्ण होतील. जेणेकरुन येथील वाहतूक कोंडीची समस्या सुटू शकेल.प्रकाश भडंगे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी
चाकण परिसरात वाहतूक कोंडीवर उपाययोजनेचे प्रयत्न दिसत आहेत; परंतु त्या कामाची गती वाढवणे आवश्यक आहे. अनेक प्रकल्प हे कागदावरच असून, राज्य शासनाने मंजुरी देऊनही कामे होत नाही. परिणामी, उद्योजकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आम्ही अनेकदा पाठपुरावा करतो. पण, त्याबाबत आणखी लक्ष घालणे आवश्यक आहे.दिलीप बटवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्री