पिंंपरी: भारतीय जनता पक्षाने जवळपास 11 माजी नगरसेवकांचे तिकीट कापले आहे. तर, नव्याने आलेल्या 50 हून अधिक जणांना उमेदवारी दिली. यामुळे अनेक प्रभागात नाराजी उफाळली आहे. पक्षाकडे खंत व्यक्त करूनही सहन न झाल्याने अनेकांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट टाकत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यातील पाच माजी नगरसेवकांनी अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत पेच निर्माण झाला आहे.
भाजपाकडून जवळपास 730 इच्छुकांची यादी होती. त्यात भाजपाचे काम करणारे व विविध पदावर कार्यरत असे जवळपास 500 हून अधिक उमेदवार होते. त्यामुळे भाजपाच्या निष्ठांवंतांना न्याय मिळेल, असे सांगण्यात येत होते; मात्र निवडणुकीचा अर्ज भरण्याची तारीख जवळ आल्यानंतर प्रवेश सुरू झाले.
त्यातच विविध प्रभागात जवळपास 50 हून अधिक प्रवेश घडवून आणले. परिणामी, अनेकांचे तिकीट जाणार हे स्पष्ट होते; मात्र पक्षाकडून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, पक्षाकडून ऐनवेळी तिकीट मिळणार नसल्याने 32 प्रभागातील नाराजांनी अपक्ष फॉर्म भरले होते. त्यापैकी काही इच्छुकांनी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाची उमेदवारी घेतली असून, विशेष म्हणजे ते भाजपाच्या विरोधात उभे राहिले आहेत.
दरम्यान, प्रभाग 17, 18, 19, 21, प्रभाग 2, 3, 5, व 24 या सर्वच प्रभागात भाजपाचे उमेदवार हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजपाची डोके वाढली आहे. त्यामुळे कधीकाळ प्रत्येकाला सोपा वाटणारा प्रभाग आता अडचणीचा ठरला आहे.
अपक्षांच्या पॅनलची भीती
प्रभागात नाराजींनी एकत्र येऊन अपक्ष पॅनल चालवता येईल का, अशी चाचपणी केली आहे. त्यामुळे सर्व नाराज एकत्र येऊन पक्षाला अडचणीत आणण्यासाठी ही रणनीती आखण्यात येत असल्याचे समजते. त्यात भाजपासोबतच राष्ट्रवादीलादेखील अडचणीचे ठरणार आहे. कारण, आतापर्यंत पक्षाने झुलवत ठेवल्याचे उट्टे काढण्यासाठी हा प्रयोग करण्यात येत असल्याचे समजते.