Bhosari Storm Water Chamber Accident Pudhari
पिंपरी चिंचवड

Bhosari Storm Water Chamber Accident: भोसरीत स्टॉर्म वॉटर चेंबरमध्ये दुचाकी अडकली; महिला-मुलाचा बचाव

उघड्या चेंबरमुळे मोठा अपघात टळला; नागरिकांच्या तत्परतेने जीव वाचले

पुढारी वृत्तसेवा

भोसरी: भोसरी परिसरात स्टॉर्म वॉटर लाईनच्या चेंबरमध्ये दुचाकीसह महिला व तीचा मुलगा फसल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. सुदैवाने नागरिकांनी तातडीने धाव घेत महिलेला बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

भोसरी, बापूजी बुवा चौक, महात्मा महात्मा फुले शाळेजवळील औद्योगिक वसाहत रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडून स्टॉर्म वॉटर लाईन व ड्रेनेज लाईन टाकण्यात आली आहे. या लाईनवर पाण्याचा निचरा होण्यासाठी ठिकठिकाणी छिद्र असलेले चेंबर बसविण्यात आले आहेत. परंतु, या चेंबरची दुरवस्था झाली आहे. याकडे महापालिकेचा संबंधित विभाग लक्ष देत नसल्याने व पावसाळापूर्व कामे पूर्ण झाल्याची बोंब ठोकणारे प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत असल्याने अशा घटना घडत आहेत. या ठिकाणी असलेले स्टॉर्म वॉटर लाईनच्या चेंबरमध्ये एका महिलेचे दुचाकी वाहन अडकले.

पाण्याचा निचरा होण्यासाठी स्ट्रॉर्मवॉटर लाइन टाकली; परंतु चेंबर रस्त्यापेक्षा वर असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पावसाचे पाणी साचून राहत असल्याने चेंबर नागरिकांच्या व वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने दुचाकीचालक महिला व तीचा मुलगा या चेंबरमध्ये अडकून पडले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत महिलेची सुखरूप सुटका केली. या घटनेत महिलेला किरकोळ दुखापत झाली. नागरिकांनी परिसरातील सर्व स्टॉर्म वॉटर लाईन चेंबरची तातडीने पाहणी करून उघडी किंवा धोकादायक चेंबर्सची डागडुजी करण्याची मागणी केली आहे.

बहुतांश चेंबरच्या झाकणांची दुरवस्था

पिंपरी-चिंचवड शहरातील कोणत्याही उपनगरांत व मुख्य रस्त्यांवर फेरफटका मारला तर कुठेना कुठे चेंबर तुटलेले, बाजूला काढून टाकलेले अथवा खचलेले दिसून येईल. यामुळे शहरात स्ट्रॉर्म वॉटर लाईन व ड्रेनेजलाईनसाठी वापरलेल्या चेंबरच्या झाकणांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नवीन झाकण टाकले तरी काही दिवसांत ते झाकून तुूटून पडत असल्याच्या अनेक घटना यापूर्वी शहरात दिसून आलेल्या आहेत. त्यात अधिकारी व कर्मचारीदेखील या दुरवस्थेकडे लक्ष देत नसल्याने सर्वसामान्य नागरिक व करदात्या नागरिकांना नियोजनशून्य प्रशासनामुळे समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे.

परिसरातील चेंबरची डागडुजी करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी असलेले चेंबर दुर्गंधीयुक्त पाणी बॅक मारत असल्याने समस्या उद्भवली आहे. त्वरित पाहणी करून येथील लाईनची दुरुस्ती करण्यात येईल.
साहेबराव पवार, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य विभाग
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने अशा ठिकाणी संरक्षक झाकणे, इशारा फलक आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने केल्या पाहिजेत. जेणे करून नागरिकांना धोक्याची कल्पना आली तर अशा दुर्घटना घडणार नाहीत.
नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT