smart meter Pudhari
पिंपरी चिंचवड

Bhosari Smart Meter Electricity Theft: स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे महागात; भोसरीत वीजचोरीची १९ प्रकरणे उघड, नऊ जणांवर गुन्हे

सील तोडून ‘सीटी बायपास’चा प्रयत्न; १२ लाख ४१ हजारांची दंडात्मक आकारणी, चर्‍होलीतील रेस्टॉरंटमध्ये रिमोट उपकरणही सापडले

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर महावितरणने थेट फौजदारी कारवाईचा बडगा उगारला आहे. भोसरी विभागातील भोसरी, आकुर्डी आणि प्राधिकरण (वीजबिल व महसूल) उपविभागात स्मार्ट मीटरचे सील तोडून ‘सीटी बायपास’द्वारे मीटरची गती कमी करून वीजचोरी केल्याची 19 प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी नऊ प्रकरणांत गुन्हे दाखल करून 12 लाख 41 हजार रुपयांची दंडात्मक आकारणी केली आहे. उर्वरित 10 प्रकरणांतही दंडाची आकारणी करून वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये केलेली चलाखी महावितरणच्या ‘स्मार्ट’ तपासणी यंत्रणेनेच हेरली. मीटरचे सील तोडणे, कव्हर उघडणे तसेच सीटी प्रणालीला बगल देऊन वीजवापर कमी दाखविण्याचा प्रयत्न तपासणीमध्ये उघडकीस आला. त्यामुळे स्मार्ट मीटरला चकवा देण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर आता थेट फौजदारी कारवाई होत आहे.

चर्‍होलीतील ‘शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट’ या व्यावसायिक वीज ग्राहकाच्या ठिकाणीही गंभीर स्वरूपाची अनियमितता आढळून आली. या ठिकाणी मीटरमध्ये छेडछाड करण्यासाठी रिमोट उपकरण बसविल्याचे तपासणीदरम्यान निदर्शनास आले. स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करून वीजचोरी करण्याचा हा गंभीर प्रकार महावितरणच्या तपासणीमध्ये पकडला गेला.

स्मार्ट मीटरला छेडछाड केल्यास थेट फौजदारी कारवाई

वीजचोरी करण्यासाठी मीटरमध्ये छेडछाड करणे, सील तोडणे किंवा सीटी बायपास करण्याचा प्रयत्न करणे, हा गंभीर प्रकार असून, अशा प्रकारांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम 2003 अंतर्गत विविध कलमांद्वारे दंडात्मक आकारणीसोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कठोर भूमिका महावितरणने घेतली आहे.

गुन्हा दाखल झालेली प्रकरणे

महावितरणच्या कारवाईत खालील वीज ग्राहकांविरुद्ध दिघी, कासारवाडी आणि रावेत पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल केले असून, त्यांच्यावर दंडात्मक आकारणी केली आहे.

  • शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट, चर्‍होली = 2,66,800 रुपये

  • सचिन भास्करराव तायडे = 1,18,360 रुपये

  • सूरज संजीवकुमार सूर्यवंशी = 1,53,770 रुपये

  • दयानंद श्रीमंत रसाळ = 1,46,070 रुपये

  • संदीप लक्ष्मण गवळी = 1,56,590 रुपये

  • विष्णू सखाराम चोपडे = 1,40,410 रुपये

  • भगवत नारायण इंगळे = 1,46,650 रुपये

  • आनंद जी. = 68,863 रुपये

  • ब्रिजेशदादा बाळासो बुतुगडे = 43,622 रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT