Open Grounds Liquor Pudhari
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Open Grounds: भोसरीत मोकळी मैदाने मद्यपींचे अड्डे; नागरिकांत भीतीचे वातावरण

उद्यानं व मैदानांत वाढता मद्यपान प्रकार; महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

विजय जगदाळे

भोसरी: परिसरातील महापालिकेची मोकळी मैदाने, उद्याने आणि निर्जन जागा मद्यपींचे अड्डे बनत चालले आहेत. सायंकाळनंतर या ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांची संख्या वाढत असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काही महाविद्यालयीन युवकांचाही या ठिकाणी वावर वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच मोकळी मैदाने, इमारती सुरक्षित करणे गरजेचे आहे.

महापालिकेच्या मोकळ्या मैदानात, इमारतींमध्ये दारूचा मोकळ्या बाटल्या व काचा, प्लास्टिकचे ग्लास, सुया पडलेल्या आहेत. परिणामी परिसराचे विद्रुपीकरण होत असून, स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत उपाययोजना करण्याची मगणी नागरिकातून होत आहे. महापलिकेच्या वतीने परिसरात नवीन मैदाने, आळंदी रस्त्यावर वाहनतळ, भोसरी रुग्णालय बाजूला नव्याने बांधलेली इमारत आदींचा विकास नागरिकांचा सोयीसाठी केला आहे.

परंतु, याठिकाणी पालिका प्रशासनाकडून योग्य अमलबजावणी व कारवाई न झाल्याने वाहनतळ व इमारत धूळ खात पडली आहे. नवीन मैदानाचे काम अर्धवट स्थितीत असल्याने या ठिकाणी पालिकेने ताबा घेण्याआधीच तळीरामांनी कब्जा घतेला आहे. तसेच काही महाविद्यालयीन युवकांचाही या ठिकाणी वावर वाढल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगितले जात आहे. याबाबत अधिक माहितीसाठी ई क्षेत्रीय अधिकारी परशुराम वाघमोडे यांना फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

परिसरात सकाळी व्यायामासाठी, फिरण्यासाठी किंवा मुलांना खेळण्यासाठी घेऊन येणाऱ्या नागरिकांना या समस्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या भागातून जाणेही असुरक्षित वाटत असल्याचे ते सांगतात. काही महाविद्यालयीन युवक या मैदानांमध्ये मित्रमंडळीसह एकत्र येत असल्याचेही दिसून येत असून, त्यापैकी काही जण व्यसनांच्या आहारी जात असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. वेळेत योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते, अशी चिंता व्यक्त होत आहे. मैदानांचे व मोकळ्या जागेचे मद्यपींच्या अड्ड्यांमध्ये होणारे रूपांतर थांबविण्यासाठी पालिका प्रशासनाने उपाययोजना करावी.

महिला-मुलींकरिता या मैदानावरील वातावरण सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक झाले आहे. एखादी अनुचित घटना घडल्यावर पालिका प्रशासन जागे होणार का? परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व पथदिवे सुरू राहतील, याची काळजी पालिकेने घेतली पाहिजे.
साहेबराव लांडगे, नागरिक.
मोकळ्या जागा आणि मैदाने दारू पिण्याचे अड्डे बनू नयेत. महापालिकेने अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमून नियमित गस्त वाढवावी. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करून नागरिकना सुरक्षित वातावरण दिले पाहिजे.
सागर गवळी, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT