भोसरी: नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला तर त्यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातो; परंतु महापालिकेच्या कामासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडूनच रस्त्याच्याकडेला कचरा टाकला जात आहे. एक प्रकारे कर्मचारीच नियमांना तिलांजली देत आहेत. असे असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे. सर्वसामान्य नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पालिका प्रशासनाला ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्याकडेला टाकलेला दुर्गंधीयुक्त ड्रेनेजचा गाळ मात्र दिसत नाही का?, असा संतप्त सवाल करदाते नागरिक उपस्थित करीत आहेत.
दुर्गंधीने नागरिक त्रस्त
भोसरी ल क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रभाग क्रमांक 7 मध्ये हा प्रकार घडला असून, संबंधितांवर कारवाई करण्यास आरोग्य विभाग आणि ड्रेनेज विभागाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ठेकेदारामार्फत परिसरातील तुंबलेली ड्रेनेज वाहिनी साफ केल्यानंतर त्यातून काढण्यात आलेला दुर्गंधीयुक्त गाळ रस्त्याच्याकडेला टाकण्यात आला. गाळाची तातडीने विल्हेवाट लावण्याऐवजी तो रस्त्यालगतच पडून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नियम फक्त नागरिकांसाठीच का?
नागरिकांसाठी एक नियम आणि ठेकेदारांसाठी दुसरा असा कारभार थांबला पाहिजे. ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. संबंधित ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली पाहिजे. तसेच कामावर देखरेख ठेवण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
कारवाई करण्यास टाळाटाळ
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिक, व्यावसायिक, छोटे-मोठे विक्रेते आदींवर आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जाते. स्वच्छतेबाबत नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातात; मग महापालिकेच्या कामासाठी असलेल्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर दुर्गंधीयुक्त गाळ टाकला जात असताना त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही?, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आरोग्य विभागातील अधिकारी तसेच ड्रेनेज विभागातील संबंधित अभियंता याकडे दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे. नियम सर्वांसाठी समान असतील तर पालिकेच्या कामातील कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांवरही कारवाई कधी करणार, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
एकीकडे पालिका प्रशासन स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करीत असल्याचे सांगतात. मात्र, दुसरीकडे पालिकेचेच काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत.साहेबराव लांडगे, नागरिक
संबंधित ठेकेदाराचे कर्मचारी सध्या कामावर नसल्याने कारवाई झाली नाही. पालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत कारवाईच्या सूचना देण्यात येतील.गौरव गायकवाड, आरोग्य निरीक्षक, ल क्षेत्रीय