Accident Pudhari
पिंपरी चिंचवड

Bhosari Brother Sister Accident: देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला; भोसरीतील सख्ख्या भाऊ-बहिणीचा अपघाती मृत्यू

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकीला पाठीमागून धडक; २१ वर्षीय भावानंतर १७ वर्षीय बहिणीचाही मृत्यू, धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: देवदर्शन करून घरी परतणाऱ्या सख्ख्या भाऊ-बहिणीच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव आलेल्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील हॉटेल पुना गेटसमोर रविवारी (दि. ११) रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला.

कौशिक रवी मुल्या (वय २१) आणि ऋषिता रवी मुल्या (१७, दोघे रा. भोसरी) अशी मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. भोसरी येथील प्रसिद्ध टेलर व्यावसायिक रवी मुल्या यांची ही मुले होत. कौशिक आकुर्डीतील एका खासगी महाविद्यालयात द्वितीय वर्षात, तर ऋषिता अकरावीत शिकत होती. अपघातानंतर दोघांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान रविवारी रात्री उशिरा कौशिकचा, तर सोमवारी (दि. १२) ऋषिताचा मृत्यू झाला.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशिक आणि ऋषिता रविवारी घोरवडेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. रात्री दुचाकीवरून भोसरीकडे परतत असताना हॉटेल पुना गेटजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या दुचाकीने (एमएच १४ एनसी ०९७४) जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले.

दरम्यान, देहूरोड पोलिसांनी धडक देणारी दुचाकी जप्त केली असून, तिच्या चालकाचा शोध सुरू आहे. अपघातात तोदेखील जखमी झाला असण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून रुग्णालयांमध्ये चौकशी केली जात आहे. सख्ख्या भावंडांच्या मृत्यूने भोसरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास देहूरोड पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT