पिंपरी: भाजपामध्ये असलेले सर्व 84 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग््रेासचे आणि अजितदादांनी तयार केलेले आहेत. शहरातील लोकप्रतिनिधीही त्यांच्या तालमीत तयार झाले आहेत. त्यामुळे त्यांचे उत्तराई होण्यासाठी तरी लाजेखातर हे अजितदादांचा पुतळा उभा करतील, असे मत विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी सोमवार (दि. 9) व्यक्त केले.
महापालिका भवनातील विरोधी पक्षनेते दालनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाऊसाहेब भोईर म्हणाले की, अजितदादांचा पुतळा उभारण्याबाबत अजून सर्वसाधारण सभेत ठराव झाला नाही; मात्र अजितदादांच्या उपकारातून यांना उत्तराई व्हावे लागेल. त्यांनीच सगळ्यांना घडवले आहे. त्यामुळे अजितदादांचा पुतळा शहरात होईलच.
गेल्या काही वर्षांमध्ये शहरामध्ये अनेक चुकीची कामे झाली आहेत. या माध्यमातून या शहराची वाट लावण्याचे काम सत्ताधारी करतील; मात्र शहराला वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मोठ्या प्रकल्पाची मी पाहणी करणार आहे. झालेल्या चुकीच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करणार आहे. अनेक निविदा वाढवून तिजोरीची लूट सुरू आहे. शहरात अनेक भागात अजूनही टँकरने पाणी घ्यावे लागते, याला जबाबदार कोण? पाणी गळती व चोरी कायम आहे. शहराचा पाणीपुरवठा हा अधिकाऱ्यांच्या नव्हे, तर व्हॉल्व्हमनच्या हातात असते. एकूण पाणीसाठा आणि प्रत्यक्ष वितरण याचे ऑडिट होणे गरजेचे अहे.
डीपी रद्द करण्याची तब्बल 50 हजार नागरिकांची मागणी आहे. डीपीमध्ये नदीकाठावर दफनभूमीचे आरक्षण नसावे, असा नियम असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. डीपी रद्दसाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. शहरात सुरक्षित वातावरण नसून, शाळा व महापाविद्यालयातील मुली सुरक्षित नाही. नदी प्रदूषण कमी करण्याच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे. फक्त विरोध करायचा म्हणून नाही, तर शहराला वाचविण्यासाठी चुकीच्या कामांना विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी विकतचा सल्ला का घेता ?
महापालिकेची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. ती घडी सुरळीत करण्यासाठी उधळपट्टी थांबवावी लागणार आहे. त्यासाठी विकतचा सल्ला घेऊ नये. शहरात आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी असंख्य असून, त्यांच्याकडून मोफत सल्ला घ्यावा. शहरात मनोज देवळेकर, इनामदार यांच्यासारखे अनेक शिक्षणतज्ज्ञ असूनही, शिक्षण विभाग लाखो रुपये खर्च करून शहराबाहेरील मंडळींकडून सल्ला घेत आहे. नाहक उधळपटी न रोखल्यास महापालिकेला पगार करण्यासाठी राज्य शासनासमोर हात पसरावे लागतील. तसेच, शहरातील लोकप्रतिनिधींनी केंद्र व राज्य शासनाकडून निधी आणावा, असे भोईर म्हणाले.
अधिकाऱ्यांचा मस्तवालपणा सहन केला जाणार नाही
प्रशासकीय राजवटीमध्ये सगळेच नाही, मात्र काही अधिकाऱ्यांना आपणच मालक असल्याचे वाटत होते. त्यामधून अनेक चुकीच्या कामांना यांनी मंजुरी दिली आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी आपण मालक नसून लोकांचे सेवक आहोत हे विसरू नये. यापुढे अधिकाऱ्यांचा असा मस्तवालपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा भाऊसाहेब भोईर यांनी दिला.