पिंपरी : लोकसंख्येने फुगत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी पाणी आणण्याचे काम कासव गतीने सुरू आहे. डिसेंबर 2024 मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन असताना, जॅकवेल, पंपिंग स्टेशन, भूमिगत जलवाहिनी आदी कामे काम अद्यापही सुरू आहेत. आता, या प्रकल्पास मार्च 2026 चा नवा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. (Latest Pimpari chinchwad News)
शहरात दाट लोकवस्ती वाढत असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. त्यामुळे पवना धरण व आंद्रा धरण योजनेचे तसेच, एमआयडीसीचे पाणी कमी पडत आहे. खेड तालुक्यातील आभा आसखेड धरणातून 167 एमएलडी पाणी महापालिकेसाठी राखीव आहे. तेथून पाणी आणण्यासाठी धरणाजवळ मौजे वाकीतर्फे वाडा येथे अशुद्ध जलउपसा केंद्रापासून ते तळेगाव येथील ब्रेक प्रेशर टँकपर्यंत 7.30 किलोमीटर अंतराची 1700 मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येत आहे. ब्रेक प्रेशर टँकपासून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी नेण्यासाठी 18.80 किलोमीटर अंतराची 1400 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. भूमिगत जलवाहिनीचे काम एकूण 26.10 किलोमीटर इतके आहे. जलवाहिनीचे काम आत्तापर्यंत 55 टक्के झाले आहे. जागा ताब्यात येण्यास व इतर तांत्रिक कारणांमुळे ते काम संथ गतीने सुरू आहे.
यंदा मे महिन्यातच पावसाळा सुरू झाला आहे. भामा-आसखेड धरण 100 टक्के भरले असल्याने तेथे जॅकवेलचे काम करताना अडचणी येत आहेत. अप्रोच पूल, स्थापत्य काम, यंत्रसामग्रीची जोडणी, पंपिंग स्टेशन, विद्युत जोडणी आदी कामे करता येत नसल्याचे चित्र आहे. धरणाचे पाणी कमी झाल्यानंतर ते काम सुरू करण्याचे नियोजन आहे.
सध्याची स्थिती लक्षात घेऊन ही दोन्ही कामे मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याची नवीन मुदत पाणीपुरवठा विभागाकडून निश्चित करण्यात आली आहे. काही अडथळे न आल्यास त्या मुदतीमध्ये जॅकवेल व जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यास एप्रिलपासून शहराला 167 एमएलडी अतिरिक्त पाणी दररोज मिळू शकणार आहे.
शहराला दररोजचा पाणीपुरवठा
पवना धरण-550 एमएलडी
आंद्रा धरण-80 एमएलडी
एमआयडीसी-20 एमएलडी
एकूण-650 एमएलडी
मुदतीमध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन
भामा आसखेड पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. धरणाजवळ जॅकवेल, पंपिंग स्टेशनचे काम सुरू आहे. तसेच, भूमिगत जलवाहिनीचे कामात येणारे अडथळे दूर करून काम पूर्णत्वास नेण्यात येत आहे. मुदतीमध्ये काम पूर्ण करून शहराला 167 एमएलडी पाणी देण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.
मुळशीतून पाणी देण्यास नकारघंटा
पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मुळशी धरणातून 760 एमएलडी पाणी आरक्षित करण्याची विनंती महापालिकेने जलसंपदा विभागाकडे डिसेंबर 2023 ला केली होती. मात्र, त्या मागणीस नकार देत राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत जलसंपदा विभागाने महापालिकेस कळविले होते. त्या संदर्भात संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत आयुक्त शेखर सिंह व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांची बैठक झाली. मात्र, मुळशी धरणात पाणी देण्यास अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.