Bribe News Pudhari
पिंपरी चिंचवड

Bribery Case: महिला सहायक निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

ज्योती पांडुरंग तांबे (वय 41) असे अटक करण्यात आलेल्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: बावधन पोलिस ठाण्यातील एका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे. गुन्ह्यात मदत करणे, नातेवाईकांची अटक टाळणे आणि दोषारोपपत्र लवकर दाखल करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे संबंधित महिला अधिकाऱ्याने पैशांची मागणी केली होती.

ज्योती पांडुरंग तांबे (वय 41) असे अटक करण्यात आलेल्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्योती तांबे यांच्याकडे होता. तपासात मदत करणे, नातेवाईकांना अटक होऊ न देणे आणि न्यायालयात दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती.

बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

तक्रारदाराने याबाबत 12 मार्च 2026 रोजी एसीबी पुणे कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एसीबीने 12 आणि 17 मार्च रोजी पडताळणी केली. चौकशीत तांबे यांनी यापूर्वीच तक्रारदाराकडून 50 हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. तसेच, उर्वरित रकमेपैकी काही रक्कम कमी करून पुन्हा पैशांची मागणी केल्याचेही स्पष्ट झाले.

ज्योती तांबे यांच्याविरोधात बावधन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT