Mharashtra Assembly Polls | सावंतवाडीत चौरंगी, कुडाळ-कणकवलीत दुरंगी File Photo
पिंपरी चिंचवड

रात्री दहानंतर लाऊडस्पीकरचा वापर केल्यास कारवाई; आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आयोगाकडून राजकीय पक्षांना इशारा

पुढारी वृत्तसेवा

Pimpri Politics: विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता जाहीर केली आहे. ती 25 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी आयोगाने काही निर्बंध घालून दिले आहेत. त्यानुसार, रात्री दहानंतर लाऊड स्पीकरवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवार व नेत्यांना रात्री दहानंतर स्पीकर चालू ठेवता येणार नाही. तसे केल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शहरात स्पीकरद्वारे प्रचार यंत्रणा राबवली जाते. तसेच, सभास्थळी मोठे साउंड लावून उमेदवार व नेत्यांची भाषणे होतात. स्पीकरच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने काही निर्बंध लागू केले आहेत.

त्यानुसार शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात कोणत्याही वाहनांवर स्पीकर बसवून त्याचा वापर फक्त सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंतच करता येणार आहे. त्यासाठीही संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, निवडणूक रिंगणातील उमेदवार किंवा स्पीकरच्या वापराचे परवानगीचे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी व जवळच्या पोलिस ठाण्याला देणे बंधनकारक आहे. स्पीकर आणि वेळेच्या मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून पथक तयार करण्यात आले आहे. रात्री दहानंतर स्वीपर चालू ठेवल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. तसेच, गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यासाठी पोलिस प्रशासन लक्ष ठेवून आहे. तक्रारीची वाट न बघता थेट ते कारवाई केली जाईल, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका

शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही मतदारसंघांत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जाहीर सभांचा धडाका सुरू झाला आहे. स्टार प्रचारकांच्या सभा होत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपच्या आमदार पंकजा मुंडे तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख आ. सचिन अहिर यांच्या सभा झाल्या आहेत. येत्या 18 नोव्हेंबरपर्यंत मोठ-मोठ्या नेत्यांच्या सभांचे शहरात आयोजन करण्यात आले आहे.

25 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात आदर्श आचारसंहिता सुरू आहे. आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय दंडविधान संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. हा आदेश 15 ऑक्टोबरपासून शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीत 25 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे, असे निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले. मतमोजणी व निकाल 23 नोव्हेंबरला होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT