परिसरात पाणी साचू नये याची दक्षता घ्या; आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिकेचे आवाहन File Photo
पिंपरी चिंचवड

Municipal Appeal: परिसरात पाणी साचू नये याची दक्षता घ्या; आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिकेचे आवाहन

पाणी साठवणारी भांडी झाकून ठेवावीत

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया व चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराजवळ किंवा आसपास पावसाचे पाणी साचू देऊ नये. आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे.

नागरिकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरात साचलेले पाणी तपासणे. दर आठवड्याला टाक्या व पाणी साठवणार्‍या भांड्यांची स्वच्छता करावी. पाणी साठवणारी भांडी झाकून ठेवावीत. डासउत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करावीत. (Latest Pimpri News)

स्वतःचे डासांपासून संरक्षण करावे. फॉगिंग व कीटकनाशक फवारणीस महापालिका कर्मचार्‍यास सहकार्य करावे. ताप व इतर लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पुरेसे पाणी प्यावे. शरीराचे द्रवपातळी संतुलित ठेवावी, असा सल्ला महापालिकेच्या डॉक्टरांनी दिला आहे.

रुग्णालये, शाळा, बँका, शॉपिंग मॉल, सिनेमागृहे, कार्यालये, उद्याने व सार्वजनिक ठिकाणांमध्ये डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट केली जात आहेत. यासंदर्भात वैद्यकीय विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी व्याख्याने, रॅली, पोस्टर स्पर्धा, पथनाट्य, सोशल मीडियावरील व्हिडिओज व एलईडी स्क्रिनद्वारे माहितीप्रसार करण्यात येणार आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने चर्चासत्र, परिसंवाद आणि जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

या मोहिमेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यासाठी नोडल वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, कीटकनाशक निरीक्षक अशा अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या 8 विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

एक लाख 84 हजार 106 घरांची तपासणी; 3 लाख 36 हजारांचा दंड वसूल

महापालिकेच्या आरोग्य पथकाने आत्तापर्यंत एक लाख 84 हजार 106 घरांची तपासणी केली आहे. त्यापैकी 3 हजार 79 घरांच्या परिसरात डासउत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले. एकूण 442 भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. एकूण 697 बांधकाम स्थळांची तपासणी करून त्यामध्ये अस्वच्छता व पाणी साचल्याचे निदर्शनास आले.

त्यापैकी 1 हजार 292 ठिकाणी नोटीस बजावण्यात आल्या असून, 122 नागरिक व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून एकूण 3 लाख 36 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नागरिकांनी आपले घर व परिसरात डासांची उत्पत्ती होण्यास प्रतिबंध घालावा. वारंवार सूचना देऊनही अंमलबजावणी होत नसेल तर होणार्‍या दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागेल, असे आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT