पिंपरी : भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या अनुप मोरे यांनी शनिवारी (दि. 1) आपल्या प्रभागात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत असून, गुन्हा दाखल होऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा रंगली आहे.(Latest Pimpri chinchwad News)
याबाबत सविस्तर वृत्त असे, की चिंचवड ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी अनुप मोरे यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता हा मेळावा होणार असून, निमंत्रणपत्रात त्यांची उपस्थिती नमूद करण्यात आली आहे. या मेळाव्याला बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, पदाधिकारी आणि नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे
भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, 26 ऑक्टोबर रोजी चिंचवड येथे काही व्यक्तींनी आमचा दादा अनुप मोरेने तुला मारायला सांगितले आहे, अशा धमक्या देत तिच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणात सुरुवातीला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मात्र, नंतर अनावधानाने राहिलेले नाव म्हणून अनुप मोरे यांचे नाव आरोपींमध्ये समाविष्ट करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील तीन जणांना अटक करण्यात आली. मात्र, अनुप मोरे पोलिसांच्या लेखी अद्याप फरार म्हणूनच नोंद आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर राजीनामा दिलेल्या अनुप मोरे यांचा मेळावा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गुन्ह्यात सहभाग असताना, त्यांच्याकडून सार्वजनिक मेळाव्याचे आयोजन हा कायद्याचा अवमान असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. पोलिसांकडून मात्र अद्याप या कार्यक्रमाबाबत कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
कार्यकर्ता मेळावा हा पूर्वनियोजित होता. मी गुरुवारी (दि. 30) राजीनामा दिला आहे. प्राधिकरण परिसरातील सर्व इच्छुक उमेदवारांना एका व्यासपीठावर आणण्याचा हा प्रयत्न असून, महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग आहे.अनुप मोरे, माजी प्रदेशाध्यक्ष, भाजयुमो
या प्रकरणात अनुप मोरे यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींपैकी काहींना अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा तपास सुरू आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत. या प्रकरणाचा तपास कायदेशीर चौकटीत पूर्ण होईल.अंकुश बांगर, वरिष्ठ निरीक्षक, चिंचवड पोलिस ठाणे