Ganeshotsav 2025 FDA Guidlines for Ganpati Mandals
पंकज खोले
पिंपरी : गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळांकडून वाटप केल्या जाणार्या प्रसादावर अन्न व औषध विभागाची नजर राहणार आहे. सार्वजनिक मंडळे प्रसाद तेथेच बनवणार असतील, तर त्याची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. तर, बाहेरुन आणलेल्या मिठाई अथवा प्रसादाची रितसर पावती अथवा नोंद ठेवावी लागणार आहे. दरम्यान, मंडळांनी रोजचा प्रसाद त्याच दिवशी वाटावा, स्वच्छता राखावी, अन्नपदार्थ व्यवस्थित हाताळावेत, अशा सूचना दिल्या आहेत. याबाबत लवकर सर्व मंडळांना कळविण्यात येणार असल्याचे अन्न व ऐाषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Pcmc News Update)
अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नियम व नियमन 2011 अंतर्गत गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना अथवा वाटताना काय काळजी घ्यावी, याबाबत अन्न व औषध विभागातंर्गत आवाहन करण्यात येते. मोठया थाटामाटात गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवात मंडळांकडून प्रसादाचे वाटप करण्यात येते. या उत्सव काळात वाटप करण्यात येणार प्रसादाबाबत दक्षता घेतली का, याची महत्त्वाची भूमिका एफडीएची असते.
गणेश मंडळांच्या सदस्यांनी अथवा प्रसाद हातळणार्या व्यक्तींनी वैयक्तीक स्वच्छेताच्या सर्व नियमांची काळजी घ्यावी, प्रसाद तयार करण्यारया व्यक्तीने हात मोजे व अॅप्रन घालावा, केस पूर्णपणे झाकलेले असावेत व तोंडाला मास्क वापरावा, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबाबतची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.
सार्वजनिक मंडळांकडून वाटप होत असलेल्या प्रसाद, महाप्रसादाची माहिती कळवणे अन्न व ऐाषध प्रशासनाकडून अनिवार्य करण्यात आले होते. त्यानुसार, गेल्या वर्षी 2024 मध्ये शहरातील फक्त 22 सार्वजनिक मंडळांनी याबाबत नोंदणी केली होती. ऑनलाईनची किचकट प्रक्रिया आणि अटींमुळे अनेक मंडळांनी त्यात भाग घेतला नसल्याचे दिसून आले
जिल्ह्यातील मोठया प्रमाणात अन्नदान करणार्या धार्मिक स्थळांची एफडीएकडून पाहणी करण्यात आली असून, पाच धार्मिक स्थळांना प्रसाद वाटपासंबंधित प्रमाणपत्र देण्यात आले आहे. संबंधित मंदिरात देण्यात येणारा प्रसाद त्याची प्रक्रिया याची त्रयस्त एजन्सीकडून तपासणी केली होती. त्यानुसार, त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.
गणेश मंडळांनी प्रसाद वाटपासबंधित ऑनलाईन फॉस कॉस नोंदणी करणे अनिर्वाय आहे. त्यासाठी संबंधित मंडळाची नोंदणी व धर्मादाय आयुक्तांची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच, त्याचे शुल्कदेखील भरावे लागणार आहे. कच्चा माल खरेदीची बिल आणि परवानाधारक दुकानातून ते खरेदी करावे, असेही एफडीएने स्पष्ट केले आहे.
मोशीतील अन्न व औषध प्रशासन हे पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत नियंत्रण ठेवते. त्यापैकी पिंपरी-चिंचवड हा वेगळा असून, त्यात दैनंदिन तपासणी, भेसळ, दुकानांचे रेकॉर्ड आणि सणासुदीच्या अनुषंगाने पाहणीसाठी अवघे 9 अधिकारी काम पाहत आहेत.
गणेश मंडळांकडून केल्या जाणार्या प्रसाद वाटपाबाबतच्या सूचना व त्याविषयीची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपल्बध आहे. त्यावरील सूचनांचे पालन मंडळांनी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे.सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (पुणे विभाग)