पिंपरी: सॉरी, मला माफ करा, मी हे स्वेच्छेने करत आहे. माझी जगायची इच्छा संपली आहे, अशी चिठ्ठी लिहून हिंजवडीतील एका आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या 25 वर्षीय तरुणीने इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना हिंजवडी येथील द क्राऊन ग्रीन सोसायटीमध्ये घडली. अभिलाषा असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. (Latest Pimpri News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा हिंजवडी आयटी पार्कमधील एका नामांकित आयटी कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. दरम्यान, 31 मे रोजी पहाटे 4 वाजून 38 मिनिटांनी ती दुचाकीवरून द क्राऊन ग्रीन सोसायटीत आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती 4 वाजून 42 मिनिटांनी लिफ्टमधून 21 व्या मजल्यावर जाताना दिसली. काही क्षणातच तिने तिथून खाली उडी मारून आपले जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच रात्रगस्त अधिकारी आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पार्किंगमध्ये असलेल्या दुचाकीच्या नंबरवरून तरुणीची ओळख पटवली. दुचाकीच्या डिक्कीत मिळालेल्या मोबाईलवरून संपर्क साधल्यावर ती अभिलाषा कोथिंबिरे असल्याचे स्पष्ट झाले.
अभिलाषा हिंजवडीतील गुरुप्रसाद होम्समध्ये राहत होती. तिची रूममेट आकांक्षा ठाकरे हिने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा रात्री 1 वाजेपर्यंत घरी होती. सकाळी 5 वाजता उठल्यानंतर ती रूममध्ये दिसली नाही. बाथरूमच्या भिंतीवर रक्ताचे पुसट डाग दिसले, मात्र त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करण्यात आले. काही वेळाने पुन्हा रूमची पाहणी केली असता तिच्या पलंगाजवळ रक्त लागलेले नॅपकिन, इनर व उशीचे कव्हर सापडले.
दरम्यान, पोलिसांनी घरझडती घेतली. त्यावेळी अभिलाषाने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी जप्त केली. सॉरी, मला माफ करा. मी हे स्वेच्छेने करत आहे. माझी जगायची इच्छा संपली आहे, असे तिने त्या चिठ्ठीत लिहिले होते. त्या नोटमध्ये तिने कोणालाही जबाबदार धरलेले नाही. हिंजवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
अभिलाषाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वायसीएम रुग्णालयात करण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या अहवालानुसार, तिचा मृत्यू Injury to multiple vital organs म्हणजेच शरीरातील अनेक महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्यामुळे झाला आहे.
या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. सध्या तरी या घटनेत कोणताही संशयास्पद प्रकार अथवा घातपाताचे संकेत मिळाले नसून, नैराश्यामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.- कन्हैया थोरात, वरिष्ठ निरीक्षक, हिंजवडी पोलिस ठाणे.