

पिंपरी: शहरातील मोठ्या हाऊसिंग सोसायट्यांना सांडपाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक असतानाही 184 सोसायट्यांमधील मैलासांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) बंद असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. अशा हाऊसिंग सोसायट्यांचे नळजोड तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आत्तापर्यंत एकूण 5 हाऊसिंग सोसायट्यांचे नळजोड महापालिकेकडून खंडित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाने 2 डिसेंबर 2020 च्या नवीन एकत्रित बांधकाम व विकास नियमावलीनुसार (यूडीसीपीआर) राज्यातील 20 हजार चौरस मीटर, त्यावरील मोठ्या क्षेत्रफळाच्या बांधकामांना, 100 सदनिका असलेल्या दीड हजार चौरस मीटर बांधकाम असलेल्या किंवा दररोज 20 हजार लिटर पाण्याचा वापर करणार्या हाऊसिंग सोसायटी, शैक्षणिक संस्था, औद्योगिक, व्यापारी, सरकारी व निमसरकारी संस्था, हॉटेल, ग्रे वॉटर ट्रीटमेंटनुसार सांडपाण्याचा पुनर्वापर करणे बंधनकारक केले आहे. एसटीपी न उभारणार्या सोसायट्या आणि आस्थापनांवर कारवाईचे अधिकार महापालिकेस देण्यात आला आहे. (Latest Pimpri News)
शहरात एकूण 456 मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत. यातील 264 सोसायट्यांत एसटीपी सुरू आहेत. उर्वरित 184 सोसाट्यांमधील एसटीपी विविध कारणांनी बंद आहेत. त्यांना वारंवार नोटीस बजावूनही प्रतिसाद दिला जात नाही. तर, 8 सोसायट्यांनी महापालिकेच्या पथकास सोसायटीमध्ये प्रवेश दिला नाही.
एसटीपी सुरू नसलेल्या हाऊसिंग सोसायट्यांचे पाणी
1 जूनपासून तोडण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. त्यानुसार पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून कारवाईस मंगळवार (दि.3)पासून सुरुवात करण्यात आली आहे. ‘ब’ आणि ‘क’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील प्रत्येकी 2, ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील एका हाऊसिंग सोसायटीचे नळजोड तोडण्यात आला आहे. नळजोड खंडित करण्याची कारवाई होऊ नये म्हणून हाऊसिंग सोसायट्यांनी तात्काळ एसटीपी सुरू करावेत, असे आवाहन मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी केले.