Akurdi Garden Play Equipment Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Akurdi Garden Play Equipment Issue: आकुर्डीत संत तुकाराम उद्यानात खेळण्यांची दुरवस्था; पालकांमध्ये नाराजी

नादुरुस्त साधनांमुळे मुलांना दुखापतींचा धोका; स्वच्छता व सुविधांबाबतही प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

आकुर्डी: सध्या काही शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. यामुळे निगडी परिसरातील संत तुकाराम महाराज उद्यानात नागरिक आपल्या पाल्यांना घेऊन उद्यानात येत आहेत. उद्यानात व मैदानावरती मोठ्या प्रमाणात मुले खेळण्यासाठी येत असल्याने मोठ्या प्रमाणात गाजावाजा असतो. अशातच संत तुकाराम उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्या काही प्रमाणात नादुरुस्त असल्याने लहान मुलांमध्ये व पालकांमध्ये नाराजी दिसत आहे.

बऱ्याच कालावधीपासून खेळण्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या खेळण्या दुरुस्तीबाबत महापालिकेकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. या नादुरुस्त खेळण्यांमुळे बऱ्याच मुलांना दुखापत होत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अशातच अंतर्गत काम व दुरुस्ती चालू असल्याकारणाने उद्यानात व्यायाम करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या गोष्टीची दखल घेऊन महापालिकेने मुलांच्या खेळण्याच्या साहित्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

नवीन खेळण्याकडे मुलांनी फिरवली पाठ

पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन ठेकेदारमार्फत संत तुकाराम उद्यानामध्ये नवीन खेळण्या बसविण्याचा घाट घातला. परंतु लहान मुलांनी याकडे पाठ फिरवली आहे. याचा उपयोग ज्येष्ठ मंडळी, नागरिक व मुले बसण्यासाठी करत आहेत. नवीन खेळण्याची केलेली कामे ही अत्यंत कुचकामी आहेत. काही दिवसांपूर्वीच एका मोठ्या सिमेंट पाईपवरती माती लावून लॉन बसविण्यात आले परंतु, ज्या दिवशी लॉन बसविले त्या दिवशीच लॉन खाली पडले. शिल्लक राहिलेले लॉनवरती आज हिरवळ शिल्लक नाही, अशी अवस्था नवीन खेळण्यांबाबत झालेली आहे. मुलांसाठी या खेळण्या नसून एक अडचण निर्माण झाली आहे.

शेवाळलेल्या पाण्यातच कारंजी

संत तुकाराम उद्यानामध्ये बऱ्याच कालावधीपासून बंद असलेल्या कारंजातील पाण्यात मोठ्या प्रमाणात शेवाळ साठले आहे. या शेवाळाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात डास पैदास होताना दिसत असून, पाण्यातून दुर्गंधी येत आहे. अशा शेवाळलेल्या पाण्यातच आज एक कारंजी सुरू करून मुलांमध्ये आनंददायी वातावरण निर्माण करण्याचा निष्पळ प्रयत्न केला जात आहे.

शौचालयाची दुरवस्था

संत तुकाराम उद्यानामध्ये नागरिक व मुलांसाठी शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु शौचालयाच्या दरवाजे मोडकळीस आले आहेत. तर काही निघून गेले आहेत. तसेच पुरेशी लाईटची व्यवस्था केली गेली नाही. त्यामुळे सूर्य मावळल्यानंतर शौचालयामध्ये जाण्यास भीती वाटते.

संत तुकाराम उद्यानात दररोज मुलांची वाढती गर्दी बघता लवकरात लवकर खेळण्यांची दुरुस्ती करावी. उद्यानातील राडारोडा उचलून सर्वत्र हिरवळ निर्माण करावी. जेणे करून मुलांना खेळताना अडथळा येणार नाही.
स्वाती पाटील, नागरिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT