Bribe News Pudhari
पिंपरी चिंचवड

RTE Admission Bribery Case: आरटीई प्रवेशासाठी लाच मागणाऱ्यास पकडले

याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: मुलीचा प्रवेश आरटीई अंतर्गत निश्चित करण्यासाठी गेलेल्या एका पित्याकडे 40 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. आकुर्डी येथील फकीर भाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेत गुरुवारी (दि. 30) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर उर्फ माउली गंगाराम जगताप (37, रा. चिंचवडेनगर, चिंचवड) असे रंगेहात पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश वाळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील 30 वर्षीय तक्रारदाराने आपल्या मुलीच्या आरटीई प्रवेशासाठी 16 मार्च 2026 रोजी ऑनलाईन अर्ज भरला होता.

27 एप्रिल रोजी ते अर्जाच्या पडताळणीसाठी आकुर्डी येथील पडताळणी केंद्रावर गेले होते. तिथे त्यांचा अर्ज रिजेक्ट झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. या वेळी त्यांची भेट संशयित माउली जगताप याच्याशी झाली. त्याने तक्रारदाराच्या मुलीच्या अर्जाची पडताळणी करून प्रवेशाची पावती मिळवून देण्यासाठी 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने 29 एप्रिल रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर 30 एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास फकीर भाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळेच्या पहिल्या मजल्यावर सापळा रचण्यात आला.

तक्रारदाराकडून 40 हजार रुपये स्वीकारताना माउली जगताप याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर अधीक्षक अजित पाटील, अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश घरबुडे, आसावरी शेंडे आणि त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT