पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात दहशतीचे वातावरण आहे. गुंडगिरी, दादागिरी, दमदाटी करून अनेकांना बोलावले जात आहे. नाही आले तर, बांधकामे थांबवण्याची धमकी दिली जात आहे. अशा दडपशाहीला कदापि खपवून घेणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल, असा गर्भित इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
प्रभाग क्रमांक 1 व 12 येथे पक्षाच्या प्रचाराची सुरूवात रविवार (दि. 28) त्यांच्या हस्ते तळवडे येथील भैरवनाथ मंदिरात आणि चिखली येथे नारळ वाढवून करण्यात आली. प्रचारासाठी झालेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, शरद भालेकर, सीमा भालेकर, चारुलता सोनवणे तसेच, यश साने, विकास साने, साधना काशिद, संगीता ताम्हाणे आदी उपस्थित होते.पक्ष सोडून भाजपामध्ये गेलेल्यांवर बोलत असताना ते म्हणाले की, आज शहरामध्ये दहशतीचे वातावरण आहे. गुंडगिरी करत अनेकांना दम दिला जात आहे. एवढ्या वर्षाच्या माझ्या राजकारणात मी कधीही फोडाफोडी केली नाही; मात्र आता याला फोड, त्याला फोड असे सुरू आहे. मी काही जणांना विचारले का पक्ष सोडला, तर ते म्हणाले, दादा त्यांनी दमच तसा दिला आहे. हे काय बरोबर नाही. अशा पद्धतीने राजकारण करू नये. ही गुंडगिरी आता पिंपरी-चिंचवडकरांनी खपवून घेता कामा नये.
भाजपाच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर पवार यांनी तोफ डागली. ते म्हणाले की, आज शहरामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना बंद जलवाहिनी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रेड झोनचा गंभीर प्रश्न आहे, तो देखील सोडवायचा आहे; मात्र सन 2017 पासून महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनेक कामांमध्ये रिंग केली जाते. ठराविक लोकांनाच डोळ्यासमोर ठेवून त्यांना कंत्राटे दिली जातात. वाढीव दराने निविदा काढली जाते. महापालिकेला कर्जात ढकलले आहे. जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे. आमच्या 25 वर्षांच्या सत्ता काळात आम्ही कधी महापालिका कर्जबाजारी केली नाही, असा घणाघात त्यांनी केला. त्यांच्या दबावाला घाबरू नका. मतदान करा. त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.महापालिकेत सत्ता नसताना देखील शहरातील अनेक कामे मार्गी लावली आहेत. तळवडेत 59 एकर गायरान जागा महापालिकेस मोफत दिली. तेथे बायोडायर्व्हसिटी पार्क उभी राहत आहे. महावितरणला 32 गुंठे जागा दिल्याने उद्योगांचा वीजपुरवठ्याचा प्रश्न सुटला आहे. येत्या निवडणुकीमध्ये महापालिकेची सत्ता हातात द्या. महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
...शहर दोघांनी वाटून घेतले आहे
मी पिंपरी-चिंचवड शहराचा विकास केला. रस्ते केले, उड्डाणपूल बांधले. तुम्ही पाच वर्षांत काय केले ते सांगा. रस्ते सफाईसाठी कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढल्या. प्रत्यक्षात रस्ते धुळीने माखले आहेत. या निविदा शहरासाठी होत्या की ठेकेदारांना पोसण्यासाठी. दोघांनी वाटून घेतले आहे. काही निवडक लोकांच्या प्रॉपर्ट्या कशा वाढल्या. बाकी लोक काम करत नाहीत का. हा पैसा कुठून येतो, याची उत्तरे द्यावी लागतील. नुसत्या जाहिराती आणि कागदी विकासाने शहर चालत नाही. नियोजन, पारदर्शकता व कामाची गती महत्त्वाची असते. इथे मात्र दबावाचे राजकारण करून निर्णय घेतले जात आहेत, असा घणाघात पवार यांनी केला.
पुरोगामी वारसा चालविणार
आम्ही पुरोगामी वारसा चालविणार आहोत. शाहू, फुले, आंबेडकराच्या विचाराने काम करीत आहोत. जातीभेद करत नाही. सर्वांचे रक्त लाल आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना उमेदवारी देत आहे. विशेषत: अनुभवी व तरुणांना संधी देत आहे. त्यात 50 टक्के महिला भगिनींना निवडणुकीत संधी दिली आहे. कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी लावून काम करावे. गाफील राहू नये. आचारसंहितेचा भंग करू नका, असे अजित पवार म्हणाले.
जनसंवादाला मोठा प्रतिसाद
शहरातील नागरिकांचे प्रश्न, समस्या व अडचणी सोडविण्यासाठी पिंपरी विधानसभेनंतर चिंचवड विधानसभेत जनसंवाद घेतला. त्याला शहरातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्याप्रमाणेच भोसरी विधानसभेत जनसंवाद घेण्यात येणार आहे. त्यात खंड पडू देणार नाही, असे अजित पवार म्हणाले.
शहरात पाच विधानसभा मतदारसंघ होणार
मी आमदार असताना दीड लाख मतदारांचा विधानसभा मतदारसंघ होता. आता चिंचवड व भोसरी विधानसभा मतदारसंघात 6 लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत. आता, शहरात 5 विधानसभा मतदार संघ होणार आहेत. झपाट्याने शहराची लोकसंख्या वाढत असून, शहर फुगत चालले आहे. त्या दृष्टीने नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच, पवना बंद जलवाहिनीचे काम करावे लागेल. भामा आसखेड, आंद्रा धरणाचे पाणीही भविष्यात शहराला कमी पडणार आहे. टाटा धरणातून पाणी आणण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे अजित पवार म्हणाले.