Ajit Pawar Pudhari
पिंपरी चिंचवड

Ajit Pawar Pimpri Chinchwad Development: पिंपरी-चिंचवडचा विकासशिल्पकार: अजितदादांचे व्हिजन, धाडस आणि मानवी नेतृत्व

जेएनएनयूआरएमपासून बेस्ट सिटी पुरस्कारापर्यंत, शहराच्या विकासाची आणि माणुसकीची कहाणी

पुढारी वृत्तसेवा

मिलिंद कांबळे

पिंपरी: जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन (जेएनएनयूआरएम) अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेस कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्याला तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी खंबीर साथ दिली. त्या निधीतून प्रामुख्याने शहरातील रस्ते प्रशस्त करण्यात आले. रस्ते तयार करून संपूर्ण शहराची कनेक्टिव्हिटी वाढविण्यात आली. त्यामुळे शहराचा चारही बाजूने नियोजनबद्ध विकास होण्यास मदत झाली. बदलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला बेस्ट सिटी असा केंद्र सरकारचा पुरस्कारही मिळाला.

पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी या प्रमुख गावांचे मिळून पिंपरी-चिंचवड नगरपालिका झाली. त्यानंतर 1980 ला महापालिकेची स्थापना झाली. खासदार झाल्यानंतर सन 1991 पासून अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष घालण्यास सुरुवात केली. तब्बल 25 वर्षे त्यांनी शहर विकासाचे व्हिजन राबवले. प्रथम शहरातील रस्ते प्रशस्त करत, उड्डाणपूल व पूल, भुयारी मार्ग, ग्रेडसेरपेटरला पसंती दिली. शहराच्या चारही बाजूने रस्ते तयार करत शहर विकासाला चालना दिली. त्यासाठी जेएनएनयूआरएममधून प्राप्त झालेला निधी शहराला बूस्ट देणारा ठरला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडला बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळाला होता. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे महापौर योगेश बहल यांनी तो पुरस्कार स्वीकारला होता. शहराच्या विकासामुळे राहण्यायोग्य शहर म्हणून देशात पिंपरी-चिंचवडला मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे शहरात टोलेजंग इमारती उभ्या राहून, दाट लोकवस्तीमुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांचे श्रेय अजित पवार यांना जाते. ते विरोधकही मान्य करतात.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असताना, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील पीडित कुटुंबासाठी मात्र 22 मे 2025 रोजी आलेला अजितदादांचा तो फोन मन हेलावून टाकणारी आठवण ठरत आहे. दुःख, भीती आणि असहायतेच्या गर्तेत सापडलेल्या त्या क्षणी दादांचा आवाज ऐकू येणे म्हणजे आम्हाला पुन्हा श्वास मिळाल्यासारखं होते, अशा शब्दांत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी ‌‘पुढारी‌’शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुलगी गेल्यानंतर आमचं घर हे घर राहिलंच नव्हतं. प्रत्येक कोपऱ्यात वैष्णवीची आठवण होती. बोलायला शब्द नव्हते, रडायलाही बळ नव्हते. न्याय मिळेल की नाही, हा प्रश्न छातीत बोचत होता, असे सांगताना कस्पटे थांबतात. अशा अवस्थेत अचानक दादांचा फोन आला. समोर अजितदादांचा दमदार आवाज होता. त्या क्षणी मला विश्वासच बसला नाही. दादांनी आधी सत्ता, पद किंवा राजकारण याचा कसलाही उल्लेखही केला नाही. त्यांनी फक्त विचारले तुम्ही कसे आहात? हा साधा प्रश्न, पण त्या क्षणी तो आमच्यासाठी फार मोठा होता. कुणीतरी आमचे दुःख समजून घेत आहे, ही जाणीव झाली,” असे ते सांगतात.

त्या संवादात दादांचा रोख स्पष्ट होता. तुमच्या मुलीवर अन्याय झाला आहे आणि त्या अन्यायाला जबाबदार असलेल्यांना शिक्षा होणारच, असे त्यांनी ठामपणे सांगितले. कोणीही कितीही मोठा असो, जवळचा असो, त्याची पाठराखण होणार नाही, हे शब्द आमच्यासाठी आधाराचे होते, असे कस्पटे म्हणतात. त्या एका फोननंतर वातावरण बदलले, हे ते आवर्जून सांगतात. आम्ही सामान्य माणसे. आमचे ऐकणार कोण, अशी भीती होती. पण दादांनी पोलिस आयुक्तांशी थेट बोलून कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे सांगितले. त्यानंतर तपासाला गती आली, पोलिस आमच्याशी संवेदनशीलपणे वागू लागले. आम्हांला दबाव, भीती कमी वाटू लागली. विशेषतः वैष्णवीच्या बाळाबाबत दादांनी दाखवलेली संवेदनशीलता आजही त्यांच्या मनात कोरलेली आहे. त्या लहान जीवाचे काय होणार, ही आमची मोठी चिंता होती. दादांनी स्वतः पोलिसांना सांगितले की, बाळ वैष्णवीच्या आई-वडिलांकडेच राहिले पाहिजे. त्या एका वाक्यातून त्यांना आमच्या वेदना किती खोलवर समजल्या होत्या, हे कळले, असे कस्पटे भाऊक होऊन सांगतात. “मोठ्या नेत्यांना वेळ नसतो, असे आपण नेहमी म्हणतो; मात्र दादांनी आमच्यासाठी वेळ काढला, आमच्याशी वडीलकीच्या नात्याने बोलले. तो फोन म्हणजे फक्त राजकीय आश्वासन नव्हते, तो आमच्यासाठी आधाराचा हात होता, असे कस्पटे सांगतात. आज अजित पवार यांचे निधन झाल्याने त्या आधाराची उणीव अधिक तीव्रतेने जाणवत आहे. “दादा आता आमच्यात नाहीत, याचे खूप दुःख आहे. पण, त्यांनी त्या कठीण काळात दिलेला शब्द, दिलेला धीर आम्ही कधीही विसरणार नाही. संकटात उभा राहणारा नेता कसा असतो, हे त्यांनी आम्हाला शिकवले,” अशा शब्दांत अनिल कस्पटे यांनी भावना व्यक्त केल्या. राजकारणाच्या पलीकडे जाऊन, दुःखाच्या क्षणी एका सामान्य कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे अजित पवार यांचे हे मानवी रूप आज त्यांच्या जाण्यानंतर आम्हाला अधिक ठळकपणे जाणवत आहे.

शहराला 24 तास पाणी देण्याचा वादा

राष्ट्रवादीची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड शहराला 24 तास पाणी देण्याचे आश्वासन अजितदादांनी दिले होते. त्यादृष्टीने निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र आणि रावेत अशुद्ध जलउपसा केंद्रांची क्षमता वेळोवेळी वाढविण्यात आली. अमृत योजनेत शहरातील जुन्या जलवाहिन्या बदलून नव्याने नळजोड देण्यात आले. स्वच्छ पाणी मिळावे म्हणून पवना बंद जलवाहिनी प्रकल्प राबविण्यात आला. मात्र, शेतकऱ्यांनी विरोध केल्याने तो प्रकल्प ठप्प आहे. शहराची वाढती गरज लक्षात घेऊन भामा आसखेड व आंद्रा धरणात 267 एमएलडी पाणी महापालिकेसाठी आरक्षणास त्यांनी मंजुरी मिळवून दिली. शहराला पाणी हवे असल्याने पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. तसेच, मुळशी धरणातून पाणी शहराला देण्याबाबत नियोजन करण्याचे मत व्यक्त केले होते.

प्रशस्त रस्त्यांचे जाळे

शहरातील वाहतूक रहदारी सुरळीत व्हावी, म्हणून अनेक प्रशस्त रस्ते तयार केले. अनेक ठिकाणी उड्डाणपूल तसेच ग्रेडसेपरेटर तयार केले. हजारो दुकाने व घरे पाडत शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या पुणे-मुंबई जुन्या मार्गावरील दापोडी ते निगडी हा 12.50 किलोमीटर अंतराचा ग्रेडसेपरेटर विकसित करण्यात आला. सिग्नल फ्री रस्त्यांचे राज्यात कौतुक झाले. कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकात जेआरडी टाटा दुमजली उड्डाणपूल उभारला. निगडी येथील टिळक चौकात मधुकरराव पवळे उड्डाणपूल, भोसरी येथे राजमाता जिजाऊ उड्डाणपूल, थेरगाव डांगे चौक तसेच, स्पाईन रस्ता येथे उड्डाणपूल तसेच, पिंपळे सौदागर येथे उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. अनेक ठिकाणी भुयारी मार्ग व ग्रेडसेपरेटर उभारण्यात आले आहेत. वाकड ते नाशिक फाटा, दापोडी ते निगडी, काळेवाडी फाटा ते चिखली, औंध ते किवळे हा बीआरटी मार्ग विकसित करण्यात आला. देशातील पिंपरी-चिंचवड शहरात बीआरटीएस मार्ग यशस्वीपणे सुरू आहेत. तसेच, बीआरटी मार्गासाठी नव्याने बसेस उपलब्ध करून देण्यात आले. बोपखेल परिरसरासाठी स्वतंत्रपूल उभारण्यास त्यांनी मान्यता दिली होती. अजित पवारांच्या मार्गदर्शनाखालीच निगडी येथील ग्रेडसेपरेटर, रोटरी मार्ग व उड्डाण पुलाची उभारणी झाली.

चिखली घरकुलात 6 हजार कुटुंबांना हक्काचे घर

केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने महापालिकेने चिखली, सेक्टर क्रमांक 17 व 19 येथे जेएनएनयूआरएम)अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल हा गृहप्रकल्प उभारण्यात आहे. त्यात एकूण 42 इमारतींमधील 6 हजार 636 पैकी 6 हजार 602 सदनिकांचे वितरण करण्यात आले. तेथे शहरातील हजारो कुटुंबांना स्वस्त दरात सदनिका मिळाल्या आहेत.

वेस्ट टू एनर्जीची संकल्पना अजितदादांचीच

मोशी कचरा डेपोत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणण्याची कल्पना अजित पवार यांचीच होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात वेस्ट टू एनर्जी प्रकल्प पाहण्यासाठी जपान देशाचा दौऱ्याही करण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड महापालिकेची नवीन इमारत गांधीनगर, पिंपरी येथे उभारता, दर्शनी भागात उभारण्याची कल्पना अजितदादांची होती. त्यामुळे चिंचवड येथील सायन्स पार्कशेजारी ती इमारत उभी केली जात आहे. मोशी येथे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारण्यास त्यांनीच चालना दिली. निगडी येथे जगद्गगुरू संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज भेटीचे भक्ती-शक्ती समूह शिल्प उभारण्यास अजितदादांनी पुढाकार घेतला होता.

दादांचे शहर स्वच्छतेकडे बारीक लक्ष

पिंपरी-चिंचवड शहरात आल्यानंतर त्यांचे सर्वत्र बारीक लक्ष असते. कोठे कचरा साचला आहे. कोणी भिंतीवर स्टिकर्स लावलीत. दुभाजकांतील झाडे सुकलीत. चौक विद्रुप झाला आहे. अशा बारीक सारिक गोष्टी ते टिपत. तेथूनच थेट संबंधित अधिकाऱ्यांना नाही, तर आयुक्तांना फोन करून स्पष्ट सूचना देत. त्यामुळे अजितदादांचा दरारा होता. त्यांचा दौरा असल्यास महापालिकेचे अधिकारी मंडळी स्वच्छतेकडे विशेष लक्ष देत.

भल्या पहाटेच दौऱ्यावर, अधिकाऱ्यांवरही वचक

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील प्रशासनावर गेल्या 25 वर्षांपासून पकड असलेल्या पालकमंत्री अजित पवार यांचा दोन्ही शहरांच्या विकासकामांसाठी कायम हट्ट होता. त्यातच अलीकडे त्यांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए माध्यमातून होणाऱ्या कामामध्येही जातीने लक्ष घातले होते. हिंजवडी, चाकणची वाहतूककोंडी, रिंगरोड आणि मेट्रोच्या कामाचा ते सतत आढावा घेत असत. विशेष म्हणजे पहाटे सहा वाजताच ते हिंजवडी आणि चाकण येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणांवर पोचले अन्‌‍ तेथे हजर असलेल्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना करण्याविषयी आदेश दिले. त्यांच्या एका भेटीनंतर हिंजवडी, चाकण येथील कोंडीवर उपाययोजना करण्याचे काम सुरू करण्यात आले.

पीएमआरडीएचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत; परंतु पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शहरातील विकासकामांवर त्यांचे बारीक लक्ष असे. हिंजवडीतील वाहतूककोंडी, पावसाळ्यात आयटी हबची होणारी दुरवस्था, चाकणची वाहतूककोंडी आणि एकूणच मेट्रो आणि रिंग रस्त्याच्या कामात त्यांनी लक्ष घातले होते. भल्या पहाटेच त्यांनी हिंजवडी येथील चार ठिकाणी भेट दिल्याने अधिकारी, प्रशासन आणि पोलिस प्रशासनाची झोप उडाली होती. विकासकामांना आडवे येणाऱ्यांना सरळ उचला, असे थेट आदेश दिल्याने सर्वच यंत्रणा कामला लागली होती. अखेर हिंजवडीतील नाल्यावरील इमारतींवर हातोडा पडला अन्‌‍ जवळपास दोन हजारांहून अधिक अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

तुम्हीसुद्धा वेगळे सर्व्हेक्षण करा

हिंजवडीतील समस्यांना कारणीभूत असणारे, नाल्यावर होणारी बांधकामे आणि अन्य तांत्रिक माहितीसाठी त्यांनी सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्या वेळी एमआयडीसीने पुढे येऊन स्वतःहून एका खासगी कंंपनीकडून सर्व्हेक्षण करतो असे सांगितले; पण त्यातून काहीशी शंका निर्माण झाल्याने दादांनी थेट जलसंपदा विभागालादेखील तुम्हीसुद्धा वेगळे सर्व्हेक्षण करा, असे आदेश दिल्याने सगळेच अवाक झाले.

लाडक्या बहिणींच्या पाठिंब्यामुळेच मुख्यमंत्री होणार !

काकांच्या पुण्याईने माझे खूप चांगले चालले आहे. संसारही चांगला आहे. मी सलग सहा वेळा राज्याचा मुख्यमंत्री झालो, असे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भोसरी येथील प्रचारसभेत अनवधानाने बोलले. नंतर त्या शब्दाची दुरुस्ती करत, लाडक्या बहिणींनी पाठिंबा दिल्यास मी नक्कीच मुख्यमंत्री होईल, असा आशावाद व्यक्त करत मुख्यमंत्रीपदाची आपली इच्छा जाहीरपणे प्रकट केली होती; मात्र त्यांच्या अकस्मात निधनाने त्यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न कायमचे अधुरे राहिले. अजितदादांच्या भाषणातील मुख्यमंत्री हा शब्द आठवून त्यांचे समर्थक हळहळ व्यक्त करत आहेत.

महापालिका निवडणुकीत भोसरी येथील उमेदवारांचा प्रचार करताना 13 जानेवारी रोजीच्या जाहीर सभेत अजितदादा बोलत होते. महापालिकेतील गैरकारभारावर त्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. त्यानंतर ते म्हणाले की, भोसरीत मी कोणाची उणी-धुणी काढण्यासाठी आलेलो नाही. एका रात्रीत कारवाई करीत लघुउद्योजकांचे संसार रस्त्यावर आणले. मी संसार मोडणारा नाही, तर संसार उभा करणार आहे. माझ्यात धमक आणि ताकद आहे. मला जीवनात भरभरून मिळाले आहे. माझा संसार चांगला चालला आहे. काकांच्या पुण्याईने माझे चांगले चालले आहे. काही अडचण नाही. भोसरीकरांनो मी कोणाची उणीदुणी काढण्यासाठी येथे आलेलो नाही. सहा वेळा मी राज्याचा मुख्यमंत्री झालो. नाही उपमुख्यमंत्री झालो. मुख्यमंत्री शब्द आला मात्र, ते होईनाच काय करू, असे सांगून तुमच्यामुळे सहा वेळा उपमुख्यमंत्री झालो. लाडक्या बहिणींचा पाठिंबा असल्यास काहीही शक्य आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे त्यांना एकदा तरी मुख्यमंत्री होणार, असा आत्मविश्वास असल्याचे प्रकर्षाने दिसून आले. अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची त्यांच्या समर्थकांसह चाहत्यांची मोठी इच्छा होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT