Ajit Pawar Pudhari
पिंपरी चिंचवड

Ajit Pawar Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवड आणि अजितदादा: विकास, वर्चस्व आणि स्वप्नभंगाची कहाणी

महापालिकेतील सत्ता, झंझावाती विकासकामं आणि राजकीय संघर्षांतून घडलेलं अजितदादांचं शहराशी नातं

पुढारी वृत्तसेवा

किरण जोशी

पिंपरी: बारामती लोकसभा मतदारसंघातील एक भाग म्हणून अजितदादांच्या वाट्याला पिंपरी-चिंचवड शहर आलं. शहरावर जीव जडला. महापालिका ताब्यात घेतली अन्‌‍ या शहराला नागपूरसारखा विकासाचा साज चढवायचा या झंझावातानं पेटलेल्या अजितदादांनी इथं सपाटून विकासकामं केली. पिंपरी-चिंचवडकरांच्या मनावर आपलं नाव कोरलं. माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो... माझं पिंपरी-चिंचवडवर खरंच मनापासून प्रेम आहे. या शहरासाठी माझा जीव तुटतो..! असं पोटतिडकीनं सांगणारे अजितदादा अनाहूतपणे गेले अन्‌‍ पिंपरी-चिंचवडकरांच्या काळजात धस्स झालं. दादांनी केलेल्या विकासाचा आलेख शहरवासीयांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला अन्‌‍ अजितदादांचा एकेकाळचा बालेकिल्ला हळहळला!

संपूर्ण राज्यात अजितदादांचा बालेकिल्ला म्हणून ओळख लाभलेल्या अजित पवारांची आणि पिंपरी-चिंचवडची गाठ पडली ती 1991 सालच्या लोकसभा निवडणुकीत. बारामतीचे तत्कालीन खासदार शरद पवार यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला लागल्यावर 1991 साली अजित पवारांनी बारामती लोकसभा जिंकली आणि तेव्हाच त्यांची पिंपरी-चिंचवड शहराशी गाठ पडली. कारण, त्या काळात हे शहर बारामती लोकसभा मतदारसंघात होते. बारामतीचे खासदार असले, तरी अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वाला खरी ओळख मिळाली ती पिंपरी-चिंचवडमुळे. शहरवासीयांनी भरभरून मतदान झाल्यानं भारावलेल्या अजितदादांनी या शहरावर लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर अनेक काळ त्यांनी रामकृष्ण मोरे यांच्यासमवेत शहराचं राजकारण केलं. 2002 मध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं पूर्ण सत्ता काबीज केली. त्यानंतर सलग तीन टर्म म्हणजे 2017 पर्यंत ते या शहराचे कारभारी होते. शहराच्या पायाभूत प्रश्नांना हात घालून त्यांनी विकासकामांचा झंझावात सुरू केला. राजकीय माणसं जोडली. आर्थिकदृष्ट्या प्रचंड सक्षम असणाऱ्या महापालिकेमध्ये निधीची कमतरता नव्हती. उड्डाणपूल, उद्याने, उत्तम रस्ते, ग्रेडसेपरेटर असं पायाभूत सुविधांचं जाळं त्यांनी उभं केलं. हे करताना कोणत्याही गैरप्रकाराला थारा दिला नाही. त्या काळात गाजलेल्या अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमण कारवाईवेळी त्यांनी कठोरे भूमिका घेतली.

मतांसाठी रोष ओढवून घ्यायला नको, यासाठी ते तडजोड करून कारवाई थांबेल, असा कयास मोडून काढत ते या कारवाईसाठी प्रशासनाच्या पाठीशी उभे राहिले. म्हणूनच निगडी-दापोडी या 12 किलोमीटरच्या महामार्ग प्रसंगी आपल्याच पक्षाच्या महापौराची नाराजी पत्करून त्यांनी 61 मीटर करण्याचा निर्णय घेतला. प्रचंड विरोध झुगारून शेकडो मिळकती पाडून रस्ता सुसज्ज केला. याचप्रकारे ग्रेडसेपरेटर, बीआरटीची कामं त्यांनी पूर्ण केली. सकृत्‌‍दर्शनी अतोनात नुकसान झालं. मात्र, आजही या रस्त्यावरून जाताना शहरवासीय अजितदादांचं नाव घेतात. विस्तारणाऱ्या शहराला पाण्याची टंचाई जाणवायला लागली. तहान भागविण्यासाठी पवना जलवाहिनीची योजना त्यांनीच अमलात आणली. जातीपातीचं राजकारण न करता सर्व जाती-धर्मांतील चांगले राजकीय सहकारी त्यांनी जोडले. व्हिजन असणारे अधिकारीही असले पाहिजेत, यासाठी दिलीप बंड यांच्यासारख्या खमक्या अधिकाऱ्याची आयुक्त म्हणून नियुक्ती करून अशा अधिकाऱ्यांना बळ दिलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमुळे त्या काळात नागपूरनं विकासाची गती पकडली होती. मला पिंपरी-चिंचवड शहर नागपूरसारखं करायचं आहे, असं पोटतिडकीनं सांगून कामांसाठी पाठपुरावा करायचे. त्यांच्या कडक शिस्तीची अनुभूती पदोपदी यायची. गळ्यात सोन्याची चेन घालून मिरविणाऱ्या नेत्याचा चारचौघांत पाणउतारा करताना ते मागंपुढं पाहत नसत.

राज्यातील महत्त्वाचा नेता म्हणून त्यांची ओळख वाढत गेली. तत्कालीन आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे या नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी एकापाठोपाठ राष्ट्रवादीला अलविदा करून भाजपमध्ये प्रवेश केला. 2017 मधील महापालिका निवडणुकीत अजितदादांच्या बालेकिल्ल्याला भाजपनं खिंडार पाडलं. हा पराभव त्यांना जिव्हारी लागला. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत चिरंजीव पार्थ पवार यांना त्यांनी मैदान उतरवलं. महापालिकेचा पराभव हा अपघात होता. मी जीव तोडून केलेल्या विकासकामांचं माप शहरवासीय पार्थ यांच्या पदरात टाकतील, अशी त्यांची धारण होती. मात्र, या वेळीही त्यांचा घात झाला. काहीसा संताप, नाराजी, पश्चात्ताप अशा संमिश्र भावनेनं त्यांनी हा पराभव पचवला. त्यानंतर नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी पुनश्च आक्रमक पवित्रा घेतला.

महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी राळ उठवली. या शहरावर माझं प्रेम आहे, माझा जीव तुटतो, अशी भावनिक साद त्यांनी घातली. यापूर्वी केलेल्या कामांचे दाखले देऊन यापुढं शहरासाठीचं व्हिजन ते प्रत्येक सभेत पोटतिडकीनं मांडू लागले. बोलाचालीमध्ये आमदार महेश लांडगे आणि त्यांच्यातील शाब्दिक संघर्ष टोकला गेला. या वेळी त्यांच्या पदरात अपयश आलं. गतवेळीपेक्षा 6 जास्त जागा जिंकत भाजपनं पुन्हा एकदा अजितदादांचा स्वप्नभंग केला. अजितदादा आणि महेशदादा यांच्यातील शाब्दिक लढाई संपूर्ण राज्यात सोशल मीडियावर ट्रोल झाली. महेशदादांनी मैदान मारलं. मात्र, आज अजितदादांनी अकाली एक्झिट घेतल्यावर सोशल मीडियावर पहिली पोस्ट पडली ती महेशदादा यांची. त्यात लिहिलं होतं... ही सकाळ सुन्न करणारी आहे, राजकारणातल्या मोकळ्या ढाकळ्या नेत्याचं असं जाणं धक्कादायक आहे. दादा, भावपूर्ण श्रद्धांजली..!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT