Ajit Pawar  Pudhari
पिंपरी चिंचवड

Ajit Pawar PCMC Election: ‘चुका सांगणे म्हणजे युतीधर्म न पाळणे का?’ : अजित पवारांचा फडणवीसांना सवाल

पीसीएमसी निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर अजित पवार आक्रमक, भाजपवर थेट हल्लाबोल

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: आमचा पक्ष पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक लढवत आहे. गेल्या 9 वर्षांत महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचारावर पहिल्या दिवसापासून पुराव्यानिशी बोलत आहे. मी कोणावर टीका केलेली नाही. चुका सांगणे म्हणजे युती धर्म न पाळणे होते का, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करत, 9 वर्षांनंतर निवडणुका होत असल्याने आता माझा कंठ फुटल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे, शहराध्यक्ष तुषार कामठे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल आदी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी मी केलेल्या आरोपांना भाजपाने उत्तर द्यावीत. ही त्यांच्यासोबत बैठकीत चर्चा करण्याची वेळ नाही. भोसरीचे आमदार महेश लांडगे हे कर्तृत्ववान, स्वयंपूर्व व स्वयंभू आहेत, अशी टीका त्यांनी केली.

मागील जाहिरनाम्यातील भाजपाने एकही काम केले नाही

भाजपाने 2017 च्या निवडणुकीच्या वेळेस जाहीर केलेल्या 27 कामांपैकी एकही काम केलेले नाही. हिंजवडी ते चाकण मेट्रो सुरू झाली नाही. ज्येष्ठांसाठी विविध सुविधा देणार, सांडपाण्यासून पुर्नवापर व वीज निर्मिती झाली नाही. सुसज्ज भाजी मंडई झाली नाही. नागरिकांना तीन लाखांचा आरोग्य विमा देणार, हिंजवडी परिसराती वाहतूक व्यवस्था सक्षम करणार, असे काही झालेले नाही. त्यांनी मागील 9 वर्षांत काय काम केले, हे दाखवावे, असे आव्हान अजित पवारांनी दिले.

किलर हवा की, डीलर हे ठरवा

मी काम करणारा माणूस आहे. शहराला बेस्ट सिटी बनवली. मात्र, गेल्या 9 वर्षांत शहरात दादागिरी, गुंडगिरी व दहशत वाढली आहे. रिंग करुन महापालिकेचे कामे मर्जीतील ठेकेदाराला दिली जातआहेत. महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी तुम्हाला माझ्यासारखा लिडर हवा की त्यांच्यासारखा डीलर हे मतदारांनी ठरवावे, असे आवाहन अजित पवारांनी केले.

मुस्लिम उमेदवार दिला होता, पण

राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम समाजास उमेदवारी न दिल्याबद्दल अजित पवार म्हणाले की, आझम पानसरे यांचा मुलगा निहाल पानसरे याला पक्षाने उमेदवारी दिली होती. तेथील पॅनेलमध्ये एस.सी महिला जागेसाठी सक्षम उमेदवार मिळाला नाही. पॅनेल सक्षम नसल्याने निहालपानसरे यांनी माघार घेतली. त्यामुळे मुस्लिम उमेदवार रिंगणात नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT